वनव्याच्या धुरामुळे नागरिकांना डोळ्यांचे आजार 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 एप्रिल 2017

अहेरी - तेंदूपत्ता हंगामात आलापल्ली वनपरिक्षेत्रातील शेकडो हेक्‍टर जंगल आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आहे. यामुळे परिसरातील गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर धूर पसरला आहे. यामुळे नागरिकांच्या डोळ्यांना जळजळ होण्याचा त्रास वाढला आहे. 

अहेरी - तेंदूपत्ता हंगामात आलापल्ली वनपरिक्षेत्रातील शेकडो हेक्‍टर जंगल आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आहे. यामुळे परिसरातील गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर धूर पसरला आहे. यामुळे नागरिकांच्या डोळ्यांना जळजळ होण्याचा त्रास वाढला आहे. 

गेल्या काही दिवसांपासून परिसरातील जंगलात आग लावून कचरा जाळण्याचे काम सुरू असल्याचे दिसून येत आहे. आलापल्ली वन विभागात दरवर्षी तेंदूतोडणी हंगाम सुरू होण्याआधी दरवर्षी साधारणत: मार्च, एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला जंगलाला आगी लागण्याच्या घटना घडतात. यामुळे तेंदूच्या झाडाला मोठ्या प्रमाणावर नवीन व दर्जेदार पाने फुटतात, असा यामागे तर्क आहे. मात्र, या आगीमुळे पक्षी, प्राणी, सरपटणारे प्राणी यांना प्रचंड त्रास होत आहे. अनेक पशू-पक्षी आगीच्या लोळात मारलेही जातात. वन विभागाचे अनेक कर्मचारी आग आटोक्‍यात आणण्यासाठी नित्याने प्रयत्न करीत असले, तरी आगी लागण्याचे प्रमाण मोठे असल्याने त्यांनाही आगी विझविण्यासाठी कुठे-कुठे जावे, हा प्रश्न निर्माण होतो. वरिष्ठ अधिकारी मात्र या आगीच्या घटनांकडे फार गांभीर्याने लक्ष देत नाही. उलट, त्यांनी आग लागल्यास कनिष्ठ कर्मचाऱ्यांवरच कारवाई करू, असा दम दिलेला आहे. त्यामुळे आग विझविण्याचे काम करणारे कर्मचारी प्रचंड मानसिक तणावात असल्याचे दिसून येत आहे. 

गेल्या आठवड्यात आलापल्ली वनपरिक्षेत्रात सुनील प्रेमानंद बिश्‍वास, रा. कांकेर, जि. करेनर (छत्तीसगड) याला अटक करण्यात आली. त्याने परप्रांतीय तेंदू ठेकेदारांच्या सांगण्यावरून जंगलात आग लावल्याची बाब पुढे आली. 

दुसरीकडे, अहेरी वनपरिक्षेत्रातही जंगलाला आग लावताना प्रभाष गोपाल मंडल, आशुतोष किशोर कोरेत (रा. अहेरी) या दोघांना अटक करण्यात आली. आग लावण्यात स्थानिक नागरिकांचाही सहभाग असल्याचे स्पष्ट झाले. जंगलातील आगीमुळे मोठ्या प्रमाणावर धुराचे लोट पसरले आहेत. त्यामुळे नागरिकांना डोळ्यांचा जळजळीचा त्रास जाणवत आहे. वन विभागाने यासंदर्भात तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Web Title: Causes of Eye for Citizens

टॅग्स