नागपूरची आर्या डाऊ विदर्भात पहिली

जल्लोष यशाचा - नागपूर - दहावी सीबीएसईचा निकाल सोमवारी दुपारी जाहीर झाला. परीक्षेत निर्भेळ यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांनी एकमेकांसोबत असा आनंद साजरा केला.
जल्लोष यशाचा - नागपूर - दहावी सीबीएसईचा निकाल सोमवारी दुपारी जाहीर झाला. परीक्षेत निर्भेळ यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांनी एकमेकांसोबत असा आनंद साजरा केला.

राघवी शुक्‍ला ९९; चिराग कुबडे, आयशानी प्रभू, गरिमा साने यांना ९८.८ टक्के
नागपूर - केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत दरवर्षीप्रमाणे सीबीएसई दहावीच्या निकालात यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. उपराजधानीतील भारतीय कृष्णा विद्या विहार येथील आर्या डाऊ हिने ९९.४ टक्के गुण घेऊन राज्यातून दुसरा, तर विदर्भातून पहिला क्रमांक पटकावला. 

बारावीप्रमाणेच दहावीच्या निकालातही सीबीएसईने आश्‍चर्याचा धक्‍का देत सोमवारी (ता. ६) दुपारी ३ वाजता निकालाची घोषणा केली. यामुळे शाळांची बरीच धावपळ झाली. यंदा शहरातील पन्नासहून अधिक शाळांमधून सुमारे दहा हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यामध्ये स्थानिक भारती कृष्ण विद्या विहार शाळेतील विद्यार्थिनी आर्या जयंत डाऊ हिने ५०० पैकी ४९७ गुणांसह (९९.४) राज्यातून दुसरे स्थान पटकाविले. ती विदर्भातून प्रथम आली आहे. 

यापाठोपाठ दाभा येथील सेंटर पॉईन्ट स्कूलच्या राघवी शुक्‍ला हिने ९९ टक्‍क्‍यासह दुसरे तर भारतीय विद्या भवन्सच्या श्रीकृष्णनगर शाखेतील चिराग कुबडे, नारायणा विद्यालयाची आईशानी प्रभू आणि पोद्दार इंटरनॅशनल स्कूलची गरिमा साने यांनी ९८.८ टक्के गुण मिळवीत तिसरा क्रमांक पटकावला. दरवर्षीच्या तुलनेत यंदा पंचवीस दिवस आधी निकाल हाती आला आहे.

टॉपर्स टॉक - 
रिलॅक्‍स होऊन अभ्यास केला - आर्या डाऊ
निकालात अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळाले असून ९० टक्‍क्‍याहून अधिक मिळेल अशी आशा  होती. तणावमुक्त परीक्षा दिल्याने हे यश मिळाले असल्याची प्रतिक्रिया ९९.४ टक्‍क्‍यांसह विदर्भातून प्रथम आलेल्या आर्या डाऊ हिने दिली. मिळालेल्या यशाने आनंदी असून त्याचे श्रेय शिक्षक आणि पालकांना आहे. मानव्यशास्त्र अभ्यासक्रमात प्रवेश घेत प्रशासकीय सेवेत जायचे असल्याचा मानस तिने व्यक्त केला. आर्याचे वडील जयंत डाऊ टपाल विभागात तर आई गौरी डाऊ शिक्षिका आहेत. परीक्षेदरम्यान कुठलाही ताण न घेता, चित्रपट बघून स्वत:ला रिलॅक्‍स केले. त्यानंतर रिलॅक्‍स होऊन अभ्यास केला. एनसीईआरटीच्या पुस्तकांचा आधार घेत, केलेल्या अभ्यासाचा फायदा झाल्याचे तिने सांगितले. 

कॉर्डिओलॉजिस्ट होणार - राघवी शुक्‍ला
मला मिळालेले यश अपेक्षित नव्हते. अभ्यास प्रामाणिकपणेच केला आणि ९९ टक्के गुण मिळाले. यानंतर वैद्यकीय क्षेत्रात एक निष्णात कॉर्डिओलॉजिस्ट होण्याची इच्छा सेंटर पॉइंट  स्कूल, दाभाची राघवी शुक्‍ला हिने व्यक्त केली. नेमका कुठल्या विषयाचा अभ्यास किती वेळ करायचा ते ठरविले होते. वडील प्रवीण व्यावसायिक आहेत तर आई हर्षदा इंटेरिएर डिझायनर आहे. आईवडील दोघांनीही मला खूप मदत केली. त्यांनी दोन वर्षे घरातला टीव्ही बंद ठेवला. माझ्या यशात या सर्वांचे योगदान आहेच.

नियमित अभ्यासावर भर - चिराग कुबडे
परीक्षा आहे म्हणून खूप अभ्यास करायचा असे धोरण कधीच नव्हते. मात्र, रोज नियमित अभ्यासावर भर दिला. वडील डॉ. आशीष व आई डॉ. देवल कुबडे हे दोघेही डॉक्‍टर असून त्यांनी अभ्यासात खूप मदत केली. भविष्यात मलाही त्यांच्याप्रमाणे डॉक्‍टर व्हायचे आहे अशी इच्छा ९८.८ टक्के घेत तिसरा आलेल्या भवन्स श्रीकृष्णनगर येथील चिराग कुबडे याने व्यक्त केली. अभ्यासासह अन्य पुस्तके वाचण्याची आवड असल्याचेही चिराग सांगतो.

इंजिनिअर बनायचे आहे - आयशानी प्रभू
मला जवळपास ९७ टक्के वगैरे गुण मिळतील अशी अपेक्षा होती. तशी परीक्षेसाठी कसून मेहनत केली होती, अशी प्रतिक्रिया ९८.८ टक्के गुण घेत तिसरी आलेल्या आईशानी प्रभू हिने सांगितले. वडील निखलेश प्रभूव आई हर्षदा प्रभू दोघेही वकील आहेत. अभ्यासात त्यांनी खूप साथ दिली असेही ती सांगते. अभ्यासासह पेंटिंग, स्वीमिंगमध्ये आवड असल्याचे आयशानी म्हणाली. तिला भविष्यात इंजिनिअर बनायचे आहे.

सायकॉलॉजिस्ट बनायचंय - गरिमा
निकालाने मी समाधानी आहे. मी दहावीमध्ये सुरुवातीच्या काळात थोडा अभ्यास केला. मात्र, परीक्षेच्या काळात रोज ४ ते ५ तास अभ्यासाला द्यायची. नियमित अभ्यास हा एकमेव यशाचा  मंत्र असल्याचे पोद्दार इंटरनॅशनल स्कूलची ९८.८ टक्के गुण घेणारी गरिमा साने सांगते.  विज्ञानाचा पेपर कठीण होता. मात्र, यात मला १०० गुण मिळाले. वडील डॉ. दीपक साने कार्डियोलॉजिस्ट आहेत. आई डॉ. शीतल साने फिजिशियन आहे. मात्र, मला भविष्यात सायकॉलॉजिस्ट आणि लेखिका बनायचे आहे असे गरिमा सांगते. गरिमाला नृत्यात विशेष आवड असल्याही तिने सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com