कापूस तव्यावर शेकायचा का?; सीसीआयच्या अनेक अटी

सकाळ वृत्तसेवा
05.00 AM

केंद्र शासनाच्या धोरणानुसार कापसात आठ टक्‍क्‍यांपेक्षा अधिक ओलावा असू नये. मात्र, पावसाळ्यानंतर निघालेल्या पहिल्या वेचाच्या कापसात साधारणत: 12 टक्‍क्‍यांपर्यंत ओलावा असतोच. 

पारशिवनी, (जि. नागपूर) :  बाजार समितीमध्ये सीसीआय केंद्रावर कापूस खरेदी सुरू झाली आहे. सीसीआयने कापसाला हमीभाव देण्याचा बनाव केल्याचे आता समोर आले आहे. ओलाव्याचे कारण सांगून हमीभाव देण्यास टाळाटाळ केली जात असल्याने आता कापूस तव्यावर शेकून आणायचा का? असा प्रतिप्रश्‍न करीत आहेत. 

पारशिवनी तालुक्‍यातील शेतकरी कापूस घेऊन यार्डात पोहोचल्यावर हमीभावासाठी त्यांना अनेक अटी व शर्तींचा सामना करावा लागत असल्याने त्यांच्यात नाराजीला सुरुवात झाली आहे. सीसीआयचे ग्रेडर आठ टक्के ओलावा असेल तरच हमीभाव मिळेल अशी पहिली अट घालत आहेत. अन्यथा भावात काटकसर करीत आहेत. केंद्र शासनाच्या धोरणानुसार कापसात आठ टक्‍क्‍यांपेक्षा अधिक ओलावा असू नये. मात्र, पावसाळ्यानंतर निघालेल्या पहिल्या वेचाच्या कापसात साधारणत: 12 टक्‍क्‍यांपर्यंत ओलावा असतोच. 

ओलावा असलेल्या कापसाला हमीभाव द्यावा

थंडीमुळे ओलावा धरून राहतो व तो कमी होत नाही. हे सीसीआयच्या ग्रेडर व अनेक कापूस उत्पादन, कृषी तज्ज्ञांना माहिती असूनही यात बदल किंवा शिथिलता देण्यात आली नाही यावर आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. दुसरीकडे या अटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. सरकारने तज्ज्ञांची मते जाणून 12 टक्‍क्‍यांपर्यंत ओलावा असलेल्या कापसाला हमीभाव द्यावा अशी मागणी करीत आहेत. सीसीआयला आठ टक्‍क्‍यांपेक्षा कमी ओलावा असलेला कापूस हवा असेल तर त्यांना उन्हाळ्याच्या कडकडत्या उन्हात वाळविलेला कापूस खरेदी करावा, तेव्हाच तो मिळू शकेल, असाही रोष व्यक्त केला जात आहे. 

परतीच्या पावसामुळे कापसात ओलावा

यावेळी मॉन्सून लांबल्याने व परतीच्या पावसामुळे कापसात ओलावा 15 टक्‍क्‍यांपर्यंत आला आहे. कापूस चांगला आहे, यात शंका नाही, मात्र एकंदर वातावरणाची व शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती पाहून त्यांना हमीभाव देणे गरजेचे आहे. 
- पुखराज कांबळे, शेतकरी व माजी सरपंच, पालोरा  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CCI terms of purchase of cotton