सकाळी चोरी; सायंकाळी गजाआड 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

नागपूर: पहाटे गाढ झोपेत असलेल्या प्रवाशाकडील मोबाईल चोरट्याने लंपास केला. रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी सीसीटीव्ही यंत्रणेच्या मदतीने सुगावा लावत चोरट्याला सायंकाळी गजाआड केले. हा घटनाक्रम बुधवारी नागपूर रेल्वेस्थानकावर घडला. राहुल रमेश मुल्यालवर (31, रा. पाटन, यवतमाळ) असे चोरट्याचे नाव आहे. 

प्रशांत कुमार मिश्रा हे मंगळवारी रात्री नागपूर रेल्वेस्थानकावर आले. गाडीला वेळ असल्याने प्रतीक्षालयात थांबून वाट बघत होते. पहाटेची वेळ असल्याने डोळा लागला. चोरट्याने पहाटे पाचच्या सुमारास त्यांचा मोबाईल चोरून नेला. जाग आल्यावर मिश्रा यांना मोबाईल चोरी गेल्याचे लक्षात आले. त्यांनी लागलीच लोहमार्ग ठाणे गाठून तक्रार दिली. तिथून रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनाही सूचना दिली. 
आरपीएफ ठाण्यातील सीसीटीव्ही नियंत्रण कक्षात तैनात जवानांनी फुटेजची पाहणी केली असता चोरटा मोबाईल घेऊन जाताना दिसला. फुटेजमध्ये चोरट्याचा चेहरा स्पष्टपणे दिसला. त्या आधारे चोरट्याचा शोध सुरू केला. सीसीटीव्ही कक्षातील जवान संदीप सोनवने यांना सायंकाळी 7.10 वाजताच्या सुमारास आरोपी फलाट क्र. एकवरील स्लिपर क्‍लास वेटिंग हॉलजवळ फिरताना दिसला. त्यांनी धाव घेत चोरट्याला ताब्यात घेऊन ठाण्यात आणले. चौकशीत त्याने चोरी केल्याची कबुली देत मोबाईलही दिला. पुढील कारवाईसाठी चोरीच्या मोबाईलसह चोरट्याला लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cctv caught thief