सीसीटीव्हीत आढळणार अवैध धंद्यांचे फुटेज

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 मार्च 2017

कोणत्याही घटनेमध्ये पुरावा नसल्यामुळे आरोपी निर्दोष सुटतात. त्यामुळे अपराधी प्रवृत्ती असलेल्यांचे चांगलेच फावते. चोरी, लूटमारीला आळा बसावा या हेतूने मौदा नगरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. त्यामुळे अपराधी प्रवृत्तीच्या लोकांवर वचक निर्माण होण्याची शक्‍यता आहे.

मौदा - कोणत्याही घटनेमध्ये पुरावा नसल्यामुळे आरोपी निर्दोष सुटतात. त्यामुळे अपराधी प्रवृत्ती असलेल्यांचे चांगलेच फावते. चोरी, लूटमारीला आळा बसावा या हेतूने मौदा नगरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. त्यामुळे अपराधी प्रवृत्तीच्या लोकांवर वचक निर्माण होण्याची शक्‍यता आहे.

मौदा नगरामध्ये बसस्थानक (तुकडोजी पुतळा), रबडीवाला टी पॉइंट, पावडदौना रोड, केसलापूर फाटा, तिडके कॉलेज चौक, जयस्तंभ चौक, लापका रोड आदी ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले असून हे कॅमेरे पोलिस ठाण्याशी संलग्न करण्यात आले आहेत. कॅमेरे नगरामध्ये होणाऱ्या दैनंदिन हालचालीचे चित्रण करीत असल्याने नगरात होणाऱ्या अपराधिक घटनांचा छडा लावण्यात पोलिसांना हातभार लागू शकतो. परंतु कन्हान नदीच्या पुलाजवळून व रामटेक रस्त्याकडून चोरटे नगरामध्ये प्रवेश करू शकतात. त्यामुळे नगरामध्ये रात्रीच्या वेळी पोलिसांची नियमित गस्त आवश्‍यक आहे.

मौदा शहरातून अवैध प्रवासी वाहतूक नियमितरीत्या सुरूच आहे. पोलिस ठाण्याशी संलग्न सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधून पोलिसांना ही अवैध प्रवासी वाहतूक दिसत नसल्याबाबत आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे. काही किरकोळ घटना वगळल्यास मौदा नगरात तसेही शांतताप्रिय लोकांचे वास्तव्य आहे. परंतु चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण होत असते. त्याचप्रमाणे नगरामधील सट्टा, जुगारांसारख्या अवैध धंद्याकडे तरुण आकर्षित होत असतो. अशा अवैध धंद्यांबाबत नागपूर ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयाला सूचना मिळत होत्या. या धंद्यावर प्रतिबंध लावण्याचे निर्देश 20 जानेवारीला ठाणेदार व इतर अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये देण्यात आले होते. परंतु मौदा पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे सुरूच असल्याने या महिन्याच्या 7 तारखेला नागपूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी कर्तव्यामध्ये कसूर केल्यामुळे मौदा पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक मनोज मेश्राम व नायक पोलिस शिपाई श्‍याम मरस्कोल्हे यांना निलंबित केले. त्यामुळे पोलिस वर्तुळामध्ये चांगलीच खळबळ निर्माण झालेली असून निलंबनाच्या कारवाईनंतर अवैध धंद्यावर छापे घालण्याचे सत्र मौदा पोलिसांनी सुरू केले आहे.

पोलिस निरीक्षकांना द्यावा लागेल जाब
पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या निर्देशाचे मौदा पोलिसांनी पालन न केल्यामुळे परिविक्षाधीन उपअधीक्षक विक्रम कदम यांच्या नेतृत्वात जुगारावर छापे घालण्यात आले. कर्तृत्वामध्ये कसूर केल्यामुळे उपनिरीक्षकासह दोन पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. कार्यालयीन प्रमुख म्हणून पोलिस निरीक्षकांनासुद्धा याबाबत जाब विचारण्यात येणार असल्याचे पोलिस अधीक्षक नागपूर (ग्रामीण) कार्यालयाच्या सूत्राकडून माहिती प्राप्त झाली आहे.

Web Title: CCTV will take footage of illegal activities