रिंग रोडच्या कॉंक्रिटीकरणात निकृष्ट पॅनेल

राजेश रामपूरकर
रविवार, 21 ऑक्टोबर 2018

नागपूर : शहरातील कॉंक्रिट रस्त्यांच्या गुणवत्तेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले जात असतानाच केंद्राच्या निधीतून तयार होत असलेल्या रिंगरोडमध्ये वापरण्यात आलेल्या 24 हजारपैकी एक हजार पॅनेल निकृष्ट दर्जाचे असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे कंत्राटदारांचे देयकेही रोखण्यात आल्याचे समजते.

नागपूर : शहरातील कॉंक्रिट रस्त्यांच्या गुणवत्तेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले जात असतानाच केंद्राच्या निधीतून तयार होत असलेल्या रिंगरोडमध्ये वापरण्यात आलेल्या 24 हजारपैकी एक हजार पॅनेल निकृष्ट दर्जाचे असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे कंत्राटदारांचे देयकेही रोखण्यात आल्याचे समजते.
दिल्ली येथील केंद्रीय रस्ते संशोधन संस्थेच्या तज्ज्ञ सदस्यांनी सिमेंटीकरणाच्या कामाची पाहणी केली आहे. त्यांतच याचा उल्लेख करण्यात आला आहे. रिंग रोडच्या कॉंक्रिटीकरणाचे 70 टक्के काम पूर्ण झाले आहे. यासाठी 24 हजार पॅनेल लावण्यात आले आहेत. शहरातून जाणाऱ्या 41.45 किलोमीटरच्या रिंगरोडच्या सिमेंटीकरण युद्धपातळीवर होत आहे. यासाठी 295.72 कोटी रुपये मंजूर झालेले आहे. 24 सप्टेंबर 2015 पासून कामाला सुरुवात होऊन 24 सप्टेंबर 2017 पर्यंत हे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. यात 11 पुलांच्या रुंदीकरणाच्या कामाचाही समावेश होता. रस्ते सिमेंटीकरणासाठी वीज वितरण कंपनी, महानगरपालिका, पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन, बीएसएनएलच्या सेवा स्थलांतरित करण्यासाठी बांधकाम विभागाने संबधित विभागाला पत्र दिले. या कामासाठी लागणाऱ्या 30 कोटींपैकी 26 कोटी 65 लाख रुपयांचा निधीही संबंधित संस्थांना दिला. कॉंक्रिटीकरणाच्या पहिल्या प्रस्तावात दुसऱ्या लाईनच्या डांबरीकरण केले जाणार होते. मात्र, केंद्र सरकारने दुसऱ्याही लाइनच्या सिमेंटीकरणाचा निर्णय घेतला. त्यामुळे काम वाढले. परिणामी, रिंगरोडच्या सिमेंटीकरणाचे काम अद्यापही अपूर्ण आहे. तसेच महानगर पालिका, वीज वितरण कंपनीच्या सेवांच्या स्थलांतरणाचा खर्च वाढला. परिणामी, उदय नगर ते वाठोडा मार्गावरील चार पुलांचे काम रखडले होते असे विश्‍वसनीय सूत्रांनी सांगितले.
याच कारणामुळे रिंग रोडच्या सिमेंटीकरणाचा कालावधी आता दोन वर्षावरुन तीन वर्षाचा करून कंत्राटदाराला आता मार्च 2019 पर्यंत हा रस्ता पूर्ण करुन देण्याचा कालावधी दिला आहे. तज्ज्ञांच्या चमूने निकृष्ट दर्जाचे पॅनेल वापरल्याने नापंसती दर्शवली आहे. याचा अंतिम अहवाल प्राप्त होईस्तोवर कंत्राटदारांचा निधीही रोखण्यात आलेला आहे. कंत्राटदारासोबतच्या करारातच रस्त्याच्या देखभाल व दुरुस्तीचा पाच वर्षाचे बंधपत्र केलेले आहे. त्यात पॅनेल खराब झाल्यास त्याची दुरुस्ती करावी लागणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
रिंग रोडवरील कामाची तपासणी करण्यात आलेली आहे. त्यात तीन टक्के पॅनल खराब असल्याचे निदर्शनात आले आहे.
-ए. पी. मुकटे, कार्यकारी अभियंता, वर्ल्ड बॅंक प्रकल्प

Web Title: cement road news in nagpur city