राज्यात बुद्धपौर्णिमेला होणार वन्यप्राण्यांची प्रगणना 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 फेब्रुवारी 2017

नागपूर - राज्यातील सर्वच व्याघ्रप्रकल्प आणि अभयारण्यांमध्ये 10 मे रोजी बुद्धपौर्णिमेनिमित्त पाणस्थळांवर वन्यप्राण्यांची प्रगणना होणार आहे. त्यासाठी वन्यप्रेमींची मदत घेतली जाणार आहे. महिला स्वयंसेविकासाठी विशेष व्यवस्था करण्याच्या सूचनाही देण्यात आलेल्या आहेत. 

नागपूर - राज्यातील सर्वच व्याघ्रप्रकल्प आणि अभयारण्यांमध्ये 10 मे रोजी बुद्धपौर्णिमेनिमित्त पाणस्थळांवर वन्यप्राण्यांची प्रगणना होणार आहे. त्यासाठी वन्यप्रेमींची मदत घेतली जाणार आहे. महिला स्वयंसेविकासाठी विशेष व्यवस्था करण्याच्या सूचनाही देण्यात आलेल्या आहेत. 

केंद्रीय पर्यावरण व वनखात्याने दिलेल्या पद्धतीनुसार 2010 व 2014 मध्ये देशभर व्याघ्र प्रगणना करण्यात आली. फेज फोरनुसार दरवर्षी व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात वाघांची किमान संख्या निश्‍चित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. वाघाच्या संख्येचा अंदाज घेण्यासाठी राष्ट्रीयस्तरावर निश्‍चित केलेल्या पद्धतीचा वापर होत आहे. दर चार वर्षांनी होणाऱ्या अखिल भारतीय व्याघ्र प्रगणनेत वाघासोबत इतरही त्याच्या भक्ष्याचा अंदाज घेण्यात येतो. त्यात संख्या निश्‍चित न होता केवळ भूप्रदेशनिहाय प्राण्यांच्या घनत्वाची माहिती मिळते. वन्यजीव संरक्षित क्षेत्रनिहाय व वनविभागनिहाय वाघ सोडून इतर वन्यप्राण्यांचा संख्येचा अंदाज घेण्यासाठी बुद्धपौर्णिमेला दरवर्षी पाणवठ्यावरील प्रगणना करण्यात येते. ती यंदाही 10 मे रोजी रात्री मचाणांवर बसून केली जाणार आहे. 

त्यासाठी सुरक्षित क्षेत्रात विद्यमान परिस्थितीच्या आधारे संभावित पाणस्थळांची संख्या निश्‍चित करणे, स्वयंसेवींची नोंदणी करणे, पाणस्थळावर स्थायी मचाण उभारणे, महिला स्वयंसेवकांची व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्रत्येक मचाणावर एक स्वयंसेवी खासगी व्यक्ती व एक विभागाचा प्रतिनिधी राहील. 18 वर्षांखालील व्यक्तीला प्रगणनेत सहभागी होण्यास मज्जाव आहे. महिला प्रगणनांसाठी राखीव असलेल्या मचाणांवर एक महिला स्वयंसेवी आणि त्यांचे जोडीदार व एक विभागीय प्रतिनिधी राहतील. 

प्रगणनेच्या दिवशी प्रगणकांना त्यांनी नेमून दिलेल्या मचाणांपर्यंत पोहोचवण्याची व प्रगणनेचा काळ संपल्यानंतर परत आणण्याची व्यवस्था स्थानिक पातळीवर करण्यात येणार आहे. सहा ते सात वर्षांपूर्वी राज्यातील सर्वच संरक्षित क्षेत्रांमध्ये दरवर्षी वाघ आणि बिबट्यांच्या पदचिन्हांद्वारे व प्रमुख वन्यप्राण्यांची पाणस्थळावरील प्रगणना करण्यात येत होती. परंतु, त्यात पाच ते सहा वर्षांपूर्वी वन्यप्राण्यांच्या अधिवासाचे संनियंत्रण करण्यात आले. त्यात त्रुटी आढळल्याने गेल्यावर्षीपासून प्रत्येक सुरक्षित क्षेत्रात मे महिन्यातील बुद्धपौर्णिमेला प्रगणना करण्याचे निर्देश दिले आहेत. 

Web Title: census of wild animals