महाराष्ट्रीय पंचांगाची शतकपूर्ती

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 नोव्हेंबर 2019

डॉ. राजंदेकर यांनी सुमारे 70 हजार कुंडल्यांचा अभ्यास करून अनेकांना नोकरी, व्यवसाय, कौटुंबिक अडचणींबाबत मार्गदर्शन केले आहे. आता त्यांच्या स्नुषा प्रीती हेमंत राजंदेकर यांनी पंचांगाचे गणित समजून घेत परंपरा कायम ठेवली आहे.

नागपूर ः विदर्भातून प्रसिद्ध होत असलेल्या महाराष्ट्रीय पंचांगास यंदा 100 वर्षे पूर्ण झाली आहेत. विशेष म्हणजे विदर्भातील राजंदेकर कुटुंबातील चार पिढ्यांनी या कामात स्वतः ला झोकून दिले आहे. सद्यस्थितीत राजंदेकर कुटुंबातील नातसून प्रीती राजंदेकर या महाराष्ट्रीय पंचांगाचे काम पाहत आहेत.

जातक बोध कार्यालय या संस्थेची स्थापना इ. स. 1991 मध्ये डॉ. हरिहर सीताराम राजंदेकर यांनी अकोल्याजवळील राजंदा या लहानशा गावी केली. त्याच वेळी या पंचांगाची मुहूर्तमेढ रोवल्या गेली असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. ते स्वतः निष्णात आयुर्वेदिक डॉक्‍टर होते. अकोला येथे आयुर्वेदिक कॉलेजचे स्थापनेत त्यांचाच पुढाकार होता. खगोलशास्त्राचीही त्यांना आवड होती. हैद्राबाद येथील विद्वान शास्त्री पाथ्रीकर गुरुजी यांच्याकडे त्यांनी पंचांग व ज्योतिषशास्त्राचेही शिक्षण घेतले.

भाऊसाहेब राजंदेकर यांनी राजंदा येथूनच वैदर्भ पंचांग व महाराष्ट्रीय पंचांग काढण्यास सुरुवात केली. त्यांचा मुलगा वामन हरिहर राजंदेकर यांनी त्या काळी इलेक्‍ट्रिकल इंजिनिअरची पदवी घेऊन पुणे येथे काही काळ नोकरी केली. परंतु, 1942 मध्ये त्यांनी नोकरू सोडून वडिलांच्या पंचांगकार्यात लक्ष घातले. डॉ. राजंदेकर यांनी सुमारे 70 हजार कुंडल्यांचा अभ्यास करून अनेकांना नोकरी, व्यवसाय, कौटुंबिक अडचणींबाबत मार्गदर्शन केले आहे. आता त्यांच्या स्नुषा प्रीती हेमंत राजंदेकर यांनी पंचांगाचे गणित समजून घेत परंपरा कायम ठेवली आहे.

 

रविवारी पंचांग शताब्दी प्रकाशन सोहळा

महाराष्ट्रीय पंचांगाच्या 100 व्या पंचांगाचा प्रकाशन सोहळा रविवारी (ता. 17) नागपूरच्या आय.टी.पार्क मधील पर्सिस्टंट सिस्टिम्स लि. च्या हॉलमध्ये सायंकाळी पाचला "महाराष्ट्रीय पंचांग प्रकाशन व शताब्दी सोहळा' आयोजित केला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते महाराष्ट्रीय पंचांगाच्या 100 व्या पंचांगाचे प्रकाशन करण्यात येईल. शताब्दी सोहळ्यास राष्ट्रसेविका समितीच्या पूर्वप्रमुख संचालिका प्रमिला मेढे व राष्ट्रसेविका समितीच्या संचालिका शांताक्का, विजय पोफळी महाराज व पंढरपूरचे हरिभक्त पारायण चैतन्य महाराज देगलूरकर यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. प्रकाशन कार्यक्रमानंतर ऋतुराज प्रस्तुत संत ज्ञानेश्‍वरांच्या अभंगाचे गायन व त्यावर हरिभक्त पारायण चैतन्य महाराज देगलूरकर यांचे निरूपणही होणार असल्याचे हेमंत अरुण राजंदेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Centenary of the Maharashtra Panchang