केंद्रनिहाय मतदारयादी आज होणार प्रसिद्ध 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 नोव्हेंबर 2019

राज्य सरकारने 27 ऑक्‍टोबरपर्यंत जिल्हा परिषद निवडणुकांच्या आरक्षणाबाबतची कार्यवाही पूर्ण न केल्यास राज्यातील नागपूर जिल्हा परिषदेसह पाचही जि.प.चा निवडणूक कार्यक्रम तत्काळ जाहीर करावा, असे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशात नमूद केले होते.

सकाळ वृत्तसेवा 
नागपूर, ता. 10 : जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उद्या सोमवारी (ता.11) मतदार केंद्रनिहाय अंतिम मतदारयादी प्रसिद्ध होणार आहे. त्यामुळे आता जिल्हा परिषदेचे राजकारण तापण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. 
राज्य सरकारने 27 ऑक्‍टोबरपर्यंत जिल्हा परिषद निवडणुकांच्या आरक्षणाबाबतची कार्यवाही पूर्ण न केल्यास राज्यातील नागपूर जिल्हा परिषदेसह पाचही जि.प.चा निवडणूक कार्यक्रम तत्काळ जाहीर करावा, असे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशात नमूद केले होते. त्यामुळे निवडणूक जाहीर झाल्यास प्रशासनाची तयारी असावी, याउद्देशाने निवडणूक आयोगाने मतदारयाद्या तयार करून त्या प्रसिद्ध करण्याचा कार्यक्रम जाहीर केला. राज्यातील नागपूर, धुळे, नंदूरबार, अकोला आणि वाशीम या पाच जिल्हा परिषद तसेच 36 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणूक मतदारयादी तयार करण्याचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला. या निवडणुकीसाठी अलीकडेच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी चार ऑक्‍टोबर 2019 रोजी नव्या मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या. नव्याने मतदारयादीत समाविष्ट झालेली नावे जि. प.च्या निवडणुकांसाठी वगळली जाऊ शकतात. तसे होऊ नये यासाठी निवडणूक विभागनिहाय आणि पंचायत समित्यांसाठी निर्वाचक गणनिहाय मतदार याद्यांचे विभाजन करण्यात येणार आहे. त्यासाठी चार ऑक्‍टोबर रोजीची मतदारयादी वापरली जाणार आहे. या कार्यक्रमानुसार 2 नोव्हेंबर रोजी प्रभागनिहाय प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली. त्यावर सहा नोव्हेंबरपर्यंत हरकती व आक्षेप मागविण्यात आले. आठ नोव्हेंबर रोजी याद्या अंतिम करून प्रसिद्ध केल्या. आता सोमवार, 11 नोव्हेंबर रोजी मतदान केंद्राची यादी आणि मतदान केंद्रनिहाय मतदारयादी प्रसिद्ध केली जाईल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Center-wise constituency will be famous today