प्राचार्यांसह केंद्राधिकाऱ्यांची पोलिस चौकशी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 जुलै 2019

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील अभियांत्रिकीच्या पेपरफूट प्रकरणात पहिल्यांदाच वाशीमच्या संमती महाविद्यालयाच्या प्राचार्यांसह केंद्राधिकारी व विद्यापीठाचे अधिकारी यांना समोरासमोर हजर करून फ्रेजरपुरा पोलिसांनी चौकशी केली.

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील अभियांत्रिकीच्या पेपरफूट प्रकरणात पहिल्यांदाच वाशीमच्या संमती महाविद्यालयाच्या प्राचार्यांसह केंद्राधिकारी व विद्यापीठाचे अधिकारी यांना समोरासमोर हजर करून फ्रेजरपुरा पोलिसांनी चौकशी केली.
वाशीमच्या संमती अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रियदर्शी जुहार, सहकेंद्राधिकारी प्रा. भीमराव मुंदरे, अमरावती विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यांकन विभागाचे संचालक हेमंत देशमुख आणि प्रा. दशमुखे यांच्यासह विद्यापीठातील रोजंदारी कर्मचारी आशीष राऊत, संमती महाविद्यालयातील लिपीक ज्ञानेश्वर बोरे व निखिल फाटे हे सर्वच समोरासमोर फ्रेजरपुरा ठाण्यात चौकशीसाठी हजर झाले होते. पेपर फुटला त्या वाशीमच्या परीक्षा केंद्रावर सहकेंद्राधिकारी म्हणून प्रा. मुंदरे यांची नियुक्ती होती. श्री. मुंदरे हे रामराव झनक कला व वाणिज्य महाविद्यालय, मलकापूर येथे कार्यरत आहेत. त्यांचे बयाण पोलिसांनी रविवारी (ता. 14) नोंदविले.
विद्यापीठाच्या परीक्षा मूल्यांकन विभागाचे संचालक हेमंत देशमुख यांच्या तक्रारीवरून फ्रेजरपुरा पोलिसांनी 8 जून 2019 रोजी फसवणूक, अपहारप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. हे प्रकरण विधानसभेतसुद्धा गाजल्यानंतर त्याची चौकशी सीआयडीमार्फत करण्याची घोषणा शासनाने केली. परंतु त्यानंतर आवश्‍यक ती कागदोपत्री कारवाई न झाल्यामुळे अद्याप तपास पोलिसांकडेच आहे. गुन्हा दाखल झालेल्यांपैकी बोरे हा सद्य:स्थितीत अंतरिम अटकपूर्व जामिनावर आहे.
महाविद्यालयातून संगणक जप्त
वाशीमच्या संमती महाविद्यालयातून अभियांत्रिकीचा पेपर फुटला. तेथील संगणक, सीपीयू, प्रिंटर फ्रेजरपुरा पोलिसांनी जप्त केले, असे तपास अधिकारी उपनिरीक्षक राजेंद्र लेवटकर यांनी सांगितले.
2016 पासून बोरे याच्याकडे कारभार
हिवाळी, उन्हाळी सत्रामध्ये विद्यापीठ प्रशासनाकडून परीक्षा होतात. त्यासंदर्भातील पासवर्ड 2016 मध्येच विद्यापीठाने दिला. त्याच्या वापराकरिता कुणाची नेमणूक केली नव्हती. त्यामुळे येथील लिपीक बोरे हाच त्या विषयाचे काम बघत होता, असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
अनेकांवर कारवाईची टांगती तलवार
यासंदर्भात विद्यापीठ प्रशासनाकडून अंतर्गत चौकशी सुरू आहे. जे जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई निश्‍चित होईल. त्यात वाशीमच्या संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य व सहकेंद्राधिकाऱ्यांस, ज्या विद्यार्थ्यांनी पेपर वापरला त्यांच्याविरुद्धही कारवाई होऊ शकते, असे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यांकन विभागाचे संचालक हेमंत देशमुख यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Central Investigative Police Investigation with the Principal