केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांची आढावा बैठक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 डिसेंबर 2016

गडचिरोली - सुरजागड पहाडावर नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या अग्नितांडवाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी मंगळवारी (ता. २७) गडचिरोली येथील शासकीय विश्रामगृहात लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. यावेळी सुरक्षाव्यवस्थेबाबतच्या उपाययोजनांबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले.

एटापल्ली तालुक्‍यातील बहुचर्चित सुरजागड पहाडावरून लोहखनिजाची वाहतूक करणारी जवळपास ५० वाहने नक्षलवाद्यांनी जाळल्याची घटना २३ डिसेंबरला घडली. या वाहनांमध्ये ट्रक, पोकलेन, जेसीबी व अन्य अशा ५० वाहनांचा समावेश आहे. यात कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. सुरजागड पहाडावरील लोहखनिज उत्खननाची लीज लॉयड मेटल्स या प्रमुख कंपनीसह अन्य कंपन्यांनाही मिळाली आहे. 

यंदाच्या उन्हाळ्यात या कंपन्यांनी पहाडावरून लोहखनिज उत्खनन करण्यास प्रारंभ केला. परंतु स्थानिक आदिवासी व नक्षलवाद्यांनी विरोध केल्यानंतर काही काळासाठी उत्खननाचे काम बंद करण्यात आले होते. त्यानंतर दिवाळीच्या सुमारास पुन्हा खनिज उत्खनन करून त्याची घुग्गुस येथे वाहतूक करण्यास सुरवात झाली. दरम्यान, स्थानिक आदिवासींच्या विविध संघटनांनी पुन्हा ग्रामसभा घेऊन खनिज उत्खननास तीव्र विरोध दर्शविला. मात्र नक्षलवादी शांत होते. अशातच २३ डिसेंबरला, शुक्रवारी पहाटे शेकडो सशस्त्र नक्षलवाद्यांनी अनेक वाहनांना आग लावली. उत्खननस्थळी असलेली सुमारे ५० वाहने नक्षल्यांनी पेटविली. तसेच तेथील काही मजुरांना मारहाणदेखील केली.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर मंगळवारी गडचिरोलीत आले होते. त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करून परिस्थिती जाणून घेतली. यावेळी खासदार अशोक नेते, जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख उपस्थित होते.

Web Title: central state minister meeting