अमेरिकेतील अध्यक्षांच्या मतदानातही भारतीय निरुत्साही - नितीन रोंगे

अमेरिकेतील अध्यक्षांच्या मतदानातही भारतीय निरुत्साही - नितीन रोंगे

नागपूर - अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी होणाऱ्या निवडणुकीकडे संपूर्ण जगाचे लक्ष असते. अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष नेमका कोण होणार, यासंदर्भात यावर्षी प्रचंड उत्सुकता होती. मात्र, अमेरिकेत स्थायिक झालेल्या भारतीयांनी या निवडणुकीमध्ये निरुत्साहाचे चित्र दिसल्याचे अमेरिकेतील निवडणुकीचे विश्‍लेषक नितीन रोंगे यांनी सांगितले.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या माजी विद्यार्थी संघटनेतर्फे नितीन रोंगे यांच्या "इनसाईट ऑन 2016 यूएसए प्रेसिडेन्शियल इलेक्‍शन' यावर संवाद कार्यक्रम संघटनेच्या कार्यालयात पार पडला.

अध्यक्षस्थानी ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ आणि संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. श्रीनिवास खांदेवाले, तर आयोजक सुधीर पालीवाल उपस्थित होते. नितीन रोंगे म्हणाले, "आयव्हीसी कोलंबस'संस्थेद्वारे अमेरिकेतील निवडणूक जवळून बघता आली. गत दोन अमेरिकन अध्यक्षांचा निवडणुका बघत असताना, या वेळी आलेले अनुभव बरेच वेगळे होते. रिपब्लिकनचे डोनाल्ड ट्रम्प आणि आणि डेमोक्रेटिक पक्षाच्या हिलेरी क्‍लिंटन यांच्यात असलेल्या मुख्य लढतीमध्ये प्रचाराची पातळी यावेळी बरीच खाली गेल्याचे मत अनेकांनी व्यक्त केल्याचे त्यांनी सांगितले. किमान वर्षभरापासून सुरू होणाऱ्या निवडणुकीच्या प्रक्रियेत यावेळी अमेरिकन मतदार हे बरेच गोंधळात होते. शिवाय प्रचारात यावर्षी हिलेरी क्‍लिंटन यांच्याकडून मोठ-मोठे हॉलीवूड स्टार्स आणि खुद्द ओबामा आणि मिशेल ओबामा यांनीही प्रचार केला. दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प यांनी "एकला चलो रे'चा मार्ग स्वीकारला. हिलेरी क्‍लिंटन यांनी अमेरिकेतील विविध स्टेटच्या भेटी टाळल्यात. याउलट ट्रम्प यांनी सर्व "स्टेट'ला चार ते पाचवेळा भेटी दिल्यात. यामुळेच "ट्रम्प' यांनी विजयाचा मार्ग सुकर केल्याचे स्पष्ट केले. या वेळी जाहिरातीसाठी दोन्ही उमेदवारांनी बराच पैशा खर्च केला. त्यापैकी 60 टक्के पैसा टीव्हीच्या जाहिरातीवर खर्च केल्याचे ते म्हणाले.

कार्यक्रमात माजी कुलगुरू डॉ. कमलसिंग, डॉ. विनायक देशपांडे, माजी सिनेट सदस्य डॉ. अनिल ढगे, डॉ. स्नेहा देशपांडे आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.

इलेक्‍शन कमिशनशिवाय निवडणुका
भारतासह इतर बऱ्याच देशामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था, लोकसभा, विधानसभा निवडणुका निवडणूक आयोगामार्फत होत असतात.

आयोगाच्या निर्देशानुसारच निवडणुकांदरम्यान आचारसंहिता ठरविण्यात येते. मात्र, अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्षांसोबत इतर सर्व पदांच्या निवडीसाठी कुठल्याही प्रकाराचा निवडणूक आयोग नाही. राज्यघटनेनुसार ठरवून दिलेल्या नियमानुसार मतदान होते. हे मतदान सकाळी नऊ ते रात्री बारादरम्यान करता येते. याशिवाय अनेकांना निवडणुकीत मतदानासाठी घरीच व्यवस्था करून दिली जाते.

ट्रम्पच्या विजयाचे रिपब्लिकनलाही आश्‍चर्य
डोनाल्ड ट्रम्प मूळचे रिपब्लिकन नाहीत. काही वर्षांपूर्वी एका मित्राच्या मदतीने रिपब्लिकन पक्षात प्रवेश केला. त्यानंतर त्यांना उमेदवारी मिळाली. रिपब्लिकन त्यांच्याशी इतके जुळले नव्हते. अनेकांनी त्यांच्या प्रचारही केला नाही. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प एकटेच प्रचार करीत राहिले. डेमॉक्रटिक पक्षाच्या हिलरी क्‍लिंटन यांचा पराभव केल्यानंतर रिपब्लिकन पक्षातील अनेकांना डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयावर विश्‍वास बसत नसल्याचे नितीन रोंगे म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com