पाण्यासाठी घागरी ठेवून चक्काजाम

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 सप्टेंबर 2019

मूल (चंद्रपूर,) : शहरातील अर्ध्या भागाचा पाणीपुरवठा मागील बारा दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे सर्वत्र असंतोषाचा भडका उडाला आहे. गुरुवारी (ता. 26) संतापलेल्या नागरिकांनी विश्रामगृह मार्गावर घागरी ठेवून चक्काजाम आंदोलन केले. यावेळी आंदोलनस्थळी आलेल्या नगराध्यक्ष रत्नमाला भोयर, उपाध्यक्ष नंदू रणदिवे, मुख्याधिकारी विजय सरनाईक, भाजप शहराध्यक्ष प्रभाकर भोयर यांना घेराव घालून नागरिकांनी चांगलाच जाब विचारला.

मूल शहरासाठी चोवीस तास पाणीपुरवठ्याची योजना राबविण्यात आली आहे. यासाठी नवीन जलकुंभाचीसुद्धा उभारणी करण्यात आली आहे. नवीन आणि जुने जलकुंभ मिळून नगरपालिकेतर्फे पाणीपुरवठा केला जातो. परंतु, मागील बारा दिवसांपासून शहरातील अर्ध्या भागातील पाणीपुरवठा बंद आहे. नळाद्वारे पाणीपुरवठा आज ना उद्या येईल, या आशेने महिलांनी वाट बघितली. त्याला तब्बल बारा दिवसांचा कालावधी लोटला. परंतु, पाणीपुरवठा अद्यापही सुरू झालेला नाही. त्यामुळे प्रभाग पाचमध्ये पाण्याची टंचाई जाणवल्याने हाहाकार माजला. यात तांत्रिक कारण असल्याचे नगरपरिषद प्रशासनाचे म्हणणे आहे. परंतु, बारा दिवसांपासून पाणीपुरवठा बंद असल्याने पिण्याच्या पाण्यासाठी महिलांची धावाधाव सुरू आहे.
मूल नगरपरिषदेचे तत्काळ दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करीत गुरुवारी नागरिकांच्या असंतोषाचा उद्रेक झाला. त्यांनी विश्रामगृह मार्गावर घागरी ठेवून चक्का जाम आंदोलन केले. त्यांनी नगर परिषदेविषयी असंतोष व्यक्त केला. नागरिकांचे म्हणणे ऐकण्यासाठी नगराध्यक्ष रत्नमाला भोयर, उपाध्यक्ष नंदू रणदिवे, मुख्याधिकारी विजय सरनाईक, भाजप शहराध्यक्ष प्रभाकर भोयर आंदोलनस्थळी दाखल झाले. यावेळी संतप्त नागरिकांनी त्यांना घेराव घालून चांगलाच जाब विचारला. शेवटी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी पोलिस निरीक्षक सुजितसिंग राजपूत यांनी भेट देऊन शांततेचे आवाहन केले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chakjam with a turban for water