एटापल्लीत अंनिसच्या आव्हानाला प्रतिआव्हान

मनोहर बोरकर
गुरुवार, 26 जुलै 2018

उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाच्या वतीने जनमैत्री मार्गदर्शन मेळावा प्रसंगी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी बुवाबाजी व पुजारी पासून सावध राहण्याचे केलेल्या आव्हानाला माधव मडावी या नागरिकाने प्रतिआव्हान देत अगोदर प्रशासनाने आरोग्य सेवा सुधारावी मगच पुजाऱ्यांकड़े जाण्यास रोखावे असे रोकठोक आव्हान प्रशासनास केले.

एटापल्ली (गडचिरोली) - येथे उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाच्या वतीने जनमैत्री मार्गदर्शन मेळावा प्रसंगी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी बुवाबाजी व पुजारी पासून सावध राहण्याचे केलेल्या आव्हानाला माधव मडावी या नागरिकाने प्रतिआव्हान देत अगोदर प्रशासनाने आरोग्य सेवा सुधारावी मगच पुजाऱ्यांकड़े जाण्यास रोखावे असे रोकठोक आव्हान प्रशासनास केले.

दरवर्षी, मावोवाद्यांकडून 27 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान, शहीद सप्ताह घोषित करून हिंसक कारवाया केल्या जातात याच कालावधीत पोलिसांकडून जनजागृती मेळावे आयोजित करून जनतेच्या समस्या जाणून घेत निवारण करण्याचा प्रयत्न पोलिस प्रशासनकडून केला जातो जनमैत्री मेळावा प्रसंगी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रशांत नैताम यांनी विविध हात चलाखीचे प्रयोग सादर करून बुवाबाजी करणारे कसे जनतेची दिशाभूल करतात हे उपस्थितांना पटवून दिले. तर, किशोर पाथर यांनी अंधश्रद्धा विरोधी कायदा व संरक्षण यावर मार्गदर्शन केले प्रशांत नैताम यांनी मार्गदर्शनात पुजारी व बुवाबाजी करणाऱ्यांपासून नागरिकांनी सावध राहण्याचे आव्हान केले.

यावेळी, मात्र माधव मडावी या नागरिकाने माईक हातात घेऊन तालुक्याच्या आरोग्य सेवेचे पितळ उघड़े करत वैद्यकीय रुग्णालय टोलेजंग इमारतीत असून वैद्यकीय अधिकारी कर्मचारी रेकॉर्डवर कार्यरत असले तरी ते सेवेत मात्र प्रत्यक्ष हजर राहत नाहीत. शासनाचे लाखो रुपये त्यांचे पगार व सोईसुविधेवर खर्च केला जातो मात्र नागरिकांना उपचार मिळत नाही, तसेच औषधी साठा अपुरा असतो, त्यामुळे नाइलाजास्तव पुजाऱ्याकड़े उपचार घ्यावा लागतो उपचारार्थ मरण आले तरी उपचार घेतल्याचे समाधान कुटुंबाला असते असे मत मांडून आता पोलिसांकडून आरोग्य सेवेच्या उपायोजना करण्याची मागणी माधव मडावी यांनी बोलतांना केली

यावेळी, उपविभागीय पोलिस अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी, पोलिस उपनिरीक्षक महेश पाटील, नवाज शेख, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूल समितीचे प्रशांत नैताम, किशोर पाथर उपस्थित होते. 

एटापल्ली तालुक्यात आरोग्य सेवेची समस्या आहे, त्यामुळे नागरिकांच्या तक्रारी असतात आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना लेखी पत्र देऊन समस्या निवारणाची विनंती पोलीस प्रशासनाच्या वतीने केली जाईल, असे  एटापल्लीचे उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी यांनी सांगितले आहे.

Web Title: challenge to Andhshrudha nirmulan samiti in atapally