चंद्रपूरची अनुश्री ठरली "मैं भी नायक'

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2019

चंद्रपूर : कौशल्य व बुद्धिमतेच्या जोरावर चंद्रपूरच्या अनुश्री हिरादेवे हिने "मैं भी नायक-एक दिवसाचा मुख्यमंत्री' स्पर्धेत यश मिळवले. त्याबद्दल राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्यासमवेत बुधवारी (ता. 2) महात्मा गांधी जयंतीदिनी अनुश्रीसह चौघींना एक दिवसाचा मुख्यमंत्री म्हणून तेथील राजकीय कामकाजात सहभागी होण्याची संधी मिळाली.

चंद्रपूर : कौशल्य व बुद्धिमतेच्या जोरावर चंद्रपूरच्या अनुश्री हिरादेवे हिने "मैं भी नायक-एक दिवसाचा मुख्यमंत्री' स्पर्धेत यश मिळवले. त्याबद्दल राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्यासमवेत बुधवारी (ता. 2) महात्मा गांधी जयंतीदिनी अनुश्रीसह चौघींना एक दिवसाचा मुख्यमंत्री म्हणून तेथील राजकीय कामकाजात सहभागी होण्याची संधी मिळाली.
महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसतर्फे राज्यभर "वेक अप महाराष्ट्र' अभियानांतर्गत "मैं भी नायक-एक दिवसाचा मुख्यमंत्री' स्पर्धा घेण्यात आली होती. यास्पर्धेसाठी इतिहास व राजकारण यावर एक व्हिडिओ बनवून मागविण्यात आला होता. यात राज्यातील अनेक युवक-युवतींनी सहभाग घेतला. या व्हिडिओच्या माध्यमातून 60 युवक-युवतींची निवड त्यांचे मुद्दे व बोलण्याच्या शैलीवरून करण्यात आली. त्यानंतर एक विधानसभा स्वरूप 60 सदस्यीय विधानसभेचे आयोजन मुंबई येथे करण्यात आले. यात स्पर्धकांनी राज्याची अर्थव्यवस्था व विकास आराखडा या विषयावर मते मांडली होती. त्याआधारे स्पर्धेच्या अंतिम टप्प्यात 20 स्पर्धकांची निवड करण्यात आली. ऑनलाइन व्होटिंगद्वारे मतदान घेण्यात आले. यात संपूर्ण महाराष्ट्रातून अंतिम 12 विजेत्यांमध्ये अनुश्री हिरादेवे हिची निवड झाली. त्यानंतर कॉंग्रेसशासित राज्यांत चार-चार विजेत्यांना पाठविण्यात आले. यात बुधवारी (ता.2) महात्मा गांधी जयंतीदिनी अनुश्रीसह चौघी राजस्थान येथे पोहोचल्या. जयपूर येथे महात्मा गांधी जयंती कार्यक्रमापासून मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्यासह संपूर्ण दिवस अनुश्रीसह चौघींना घालविला. पदयात्रा, विविध कार्यक्रम व सायंकाळी मुख्यमंत्री कार्यालयात चर्चेत सहभागी झाल्या. विजेत्यांच्या विविध प्रश्‍नांचे उत्तर त्यांनी दिले. येत्या काळात मुलांनी गांधीजींच्या आदर्शावर आधारित जीवन जगण्याचा मुख्यमंत्री गहलोत यांनी संदेश दिला. यासह विविध विभागाच्या कामकाजाची माहिती त्यांना देण्यात आली.
मूळची चंद्रपूरची असलेली अनुश्री सध्या औरंगाबाद येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जनसंवाद व वृत्तपत्र विद्या विभागाची विद्यार्थिनी आहे.अनुश्रीचे आईवडील चंद्रपुरात राहतात. तिची मोठी बहीण भाग्यश्री नागपूर विद्यापीठात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे.

राजस्थानचे मुख्यमंत्री श्री. गहलोत यांच्यासह "एक दिवसाचा मुख्यमंत्री' म्हणून भरपूर शिकायला मिळाले. विविध विभागाच्या कामकाजाची माहिती मिळाली. या दौऱ्यातून बऱ्याच गोष्टी अनुभवायला मिळाल्या. भविष्यातील वाटचालीसाठी नक्‍कीच उपयुक्‍त ठरेल.
- अनुश्री हिरादेवे,
"मैं भी नायक-एक दिवसाचा मुख्यमंत्री' विजेती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chandrapur anushree gets 'I too hero'