video : का भेदरली आहेत 14 गरीब कुटुंबे? वाचा...

प्रमोद काळबांडे 
Monday, 25 November 2019

""गेली 70 वर्षे ज्या मायमातीत नांगर चालवून स्वतःचे पोट भरले, तिला हिसकावण्यासाठी एक "खाणमाफिया' कोलामांच्या जिवावर उठला आहे. छोटे-मोठे सरकारी कर्मचारी घेऊन हा खाणमाफिया आमच्या उभ्या शेतीत घुसतो. रोज मारून टाकण्याची धमकी देतो. खेत खाली करो, वर्ना बहोत बुरा होगा, अशी धमकी देतो.'' "खाणमाफिया'च्या धमक्‍यांमुळे भेदरलेले शेतकरी आपबीती सांगत होते. 

नागपूर :  चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्‍यातील रायपूर हे जंगलातील गाव. कोलाम या आदिम आदिवासी जमातीचे लोक तिथे वास्तव्यास आहेत. मानवीवस्तीच्या दूर राहून उपजीविका करावी. आपली लोककला, श्रद्धा आणि सण-उत्सव जपत गरिबीत का होईना; परंतु शांततेने जीवन जगावे, ही कोलाम समाजाची संस्कृती. माणिकगड पहाडावर शेती करूनच पिढ्यान्‌पिढ्या ते जगत आहेत. त्यांची गरिबी आणि साध्या स्वभावामुळे त्यांच्या शेती बळकावण्याचे अनेकदा प्रयत्न झाले. 

आता पुन्हा एक असाच माफिया येथे वावरत आहे, अशी माहिती रायपूरचे गावपाटील झाडू कोडापे यांनी दिली. "या जमिनी कागदोपत्री आमच्याच नावी आहेत. परंतु, तो बळकावू पाहात आहे,' असे त्यांनी सांगितले. त्याचे पुरावेदेखील त्यांनी दाखविले.

रामबाई भीमा कोडापे, भीमा रामा सिडाम, तुकाराम भीमा सिडाम, सोमा रामा सिडाम, लेतू भीमा कोडापे, तुकाराम भीमा कुमरे, आयू भीमा कुमरे, भीमराव आयू कोडापे, रामा राजू सिडाम, मारू तुकाराम कुमरे, सोमा गजू सिडाम, तुकाराम भीमा सिडाम, झाडू आयू कोडापे आदी शेतकऱ्यांनीही अशीच आपबीती कथन केली. 

Image may contain: 14 people, people smiling, people standing and outdoor
पहिल्यांदाच नागपूर येथील एखाद्या कार्यालयात येण्याची हिंमत चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्‍यातील कोलामबांधवांनी केली. यावेळी "सकाळ'जवळ आपबीती मांडली. 

"परिवाराले तं मराच लागनं!'

"सकाळ' प्रतिनिधीजवळ कोलामांनी आपली व्यथा मांडली. भीमबाई सिडाम म्हणाल्या, ""माह्या सासऱ्याची पाच एकर जमीन आहे. आमी नवरा-बायको मर मर काम करतो. तव्हा दोघं पोर आन्‌ परिवाराचं पोट भरते. खेती सुटली तं परिवाराले मराच लागनं. कापूस, सोयाबीन, तूर होते. तेच्यावर भागोतो. थो गुंडा पिकं लंबे करून राह्यला आमचे. त्यानं खंबा बी गाडला.'' 

Image may contain: tree, plant, sky, grass, outdoor and nature
"शेती खाली करा', असे सांगत कापसाच्या उभ्या पिकात गाडलेला सिमेंटचा खांब. असे खांब भरपिकात ठिकठिकाणी टाकले जात आहेत. 

"खदान खोदू, खेती बंद करा'

नामदेव झाडू कोडापे ह्यांचीही पाच एकर शेती आहे. ""माह्या खेतीले बी सर्वेच्या नावांत थो आल्ता. तेच्या संग पटवारी बी होता. कोर्टातून आदेश आला हाये. तुमाले जमीन खाली कराव लागनं. इथं मातीच्या खदान होणार आहे. असं त्यानं सांगतलं. कव्हा बी येते सायेब तो. काय करावं कायी समजून नायी राह्यलं. तेच्यासंग गोवर्धन पटवारी बी आल्ता.'' अशी माहिती नामदेवरावांनी दिली. 

तलाठी म्हणतो, "नायी सायेब'

मिलिंद गोवर्धन हे नगराळा येथील तलाठी आहेत. ""तुम्ही शेती खाली करायला त्या कथित खाण माफियासोबत गेले होते का?' असा प्रश्‍न त्यांना विचारला. त्यावर ते म्हणाले, ""नायी सायेब, थो बल्लारशाचा माणूस आहे. त्याचा आणि माझा प्रेमाचा परिचय आहे. म्हणून गेलो होतो. शेतकऱ्यांच्या जमिनी खाली कराले नायी गेलतो.'' 

गरीब स्वभावाचा गैरफायदा

"कोलाम विकास फाउंडेशन'चे अध्यक्ष विकास कुंभारे यांच्यासह कोलामबांधव नागपूर येथे विभागीय आयुक्त आणि आदिवासी विभागाचे अतिरिक्त आयुक्तांना भेटून तक्रार दिली. ""या लोकांच्या गरीब स्वभावाचा गैरफायदा लोक घेतात. पिढ्यान्‌पिढ्यापासून शेती कसणाऱ्या शेतकऱ्यांची जमीन हिसकावली की, ते विस्थापित होतील. या विषयावर आम्ही लवकरच मोठे आंदोलन उभारणार आहोत,'' अशी माहितीही त्यांनी दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: chandrapur : Attempts to grab a house from a mining mafia