चंद्रपूर महानगरपालिका विदर्भात प्रथम

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 मार्च 2019

चंद्रपूर : "स्वच्छ सर्वेक्षण 2019'च्या स्वच्छता परीक्षेत चंद्रपूर महानगरपालिकेने विदर्भात प्रथम क्रमांक मिळविला आहे. महाराष्ट्रात तिसऱ्या, तर देशातून 29 व्या क्रमांकावर चंद्रपूर मनपाचा समावेश आहे. विशेष म्हणजे 3 ते 10 लाख लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये (मध्यम शहर) नागरिकांच्या प्रतिक्रिया (सिटिझन फीडबॅक) या घटकात चंद्रपूर मनपाने देशातून प्रथम क्रमांक पटकाविला आहे.

चंद्रपूर : "स्वच्छ सर्वेक्षण 2019'च्या स्वच्छता परीक्षेत चंद्रपूर महानगरपालिकेने विदर्भात प्रथम क्रमांक मिळविला आहे. महाराष्ट्रात तिसऱ्या, तर देशातून 29 व्या क्रमांकावर चंद्रपूर मनपाचा समावेश आहे. विशेष म्हणजे 3 ते 10 लाख लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये (मध्यम शहर) नागरिकांच्या प्रतिक्रिया (सिटिझन फीडबॅक) या घटकात चंद्रपूर मनपाने देशातून प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
आज, बुधवारी दिल्ली येथील विज्ञान भवनात "स्वच्छ सर्वेक्षण 2019' पुरस्काराचा वितरण सोहळा पार पडला. सोहळ्यात राष्ट्रपतींच्या हस्ते चंद्रपूरच्या महापौर अंजली घोटेकर आणि मनपा आयुक्त संजय काकडे यांना सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी उपमहापौर अनिल फुलझेलेही उपस्थित होते. देशातील सर्व शहरांमधील नागरिकांना स्वच्छ पर्यावरण व चांगले आरोग्य मिळावे यासाठी केंद्र शासनाने स्वच्छ भारत अभियान संपूर्ण देशामध्ये राबविण्याची घोषणा केली होती. 2 ऑक्‍टोबर 2014 पासून हे अभियान सुरू झाले. 31 जानेवारी 2019 पर्यंत अभियान राबविण्यात आले. यावर्षी सर्वेक्षणाची व्याप्ती वाढवून एक लाख आणि त्याहून जास्त लोकसंख्या असलेल्या देशातील चार हजार 237 शहरांमध्ये स्वच्छ सर्वेक्षण राबविण्यात आले. यात 1 लाखपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये चंद्रपूर मनपाने देशातून 29 वा क्रमांक, 3 ते 10 लाख लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये (मध्यम शहर) नागरिकांच्या प्रतिकिया (सिटिझन फीडबॅक) घटकात देशातून प्रथम क्रमांक, महाराष्ट्रातून तिसऱ्या, तर विदर्भातून पहिला क्रमांक प्राप्त केला आहे.
शहरांतील सार्वजनिक स्वच्छतेचा दर्जा उंचावण्यासाठी नगरविकास मंत्रालयाने 2014 मध्ये स्वच्छ सर्वेक्षणाची सुरवात केली होती. देशपातळीवरील हे सर्वेक्षण नावीन्यपूर्ण पद्धतीने व विहित कालमर्यादेत पार पडले. नागरिकांना मोठ्या प्रमाणात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देणे आणि लहान तसेच मोठी शहरे यांना अधिक राहण्यायोग्य बनविण्याच्या दिशेने सर्वांनी एकत्रित काम करणे याविषयी समाजाच्या सर्व घटकांमध्ये जनजागृती करणे हे या सर्वेक्षणाचे उद्दिष्ट होते. शहरे अधिक स्वच्छ करणे, नागरी संस्थांतर्फे दिल्या जाणाऱ्या सेवांच्या दर्जामध्ये सुधारणा करून शहरांमध्ये निकोप स्पर्धेला उत्तेजन हा या स्पर्धेचा उद्देश होता.

गेल्या वर्षीही स्वच्छतेत उल्लेखनीय काम केले. केवळ नागरिकांच्या प्रतिक्रिया (सिटीझन फीडबॅक) या घटकात मागे पडलो. मात्र, यावर्षी नागरिकांनी महानगरपालिकेचे प्रयत्न जाणून व स्वच्छता ही आपली जबाबदारी समजून स्वच्छता प्रश्‍नांना उत्तरे दिली. शहराला विदर्भातून प्रथम, राज्यात तिसरे आणि देशात 29 व्या क्रमांकावर आणण्यास मदत केली आहे. स्वच्छ सर्वेक्षणात नागरिक, नगरसेवकांनी मोलाची मदत केली. त्याचे हे फलित आहे.
-संजय काकडे
आयुक्त, मनपा, चंद्रपूर.

Web Title: Chandrapur Municipal Corporation First in Vidarbha