कोसंबीतील प्रकल्पग्रस्तही चढले टाकीवर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

राजुरा (जि. चंद्रपूर) : माणिकगड सिमेंट उद्योगाद्वारे केलेल्या जमीन अधिग्रहणात झालेल्या अन्यायाविरुद्ध येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर कोसंबी (ता. जिवती) येथील प्रकल्पग्रस्तांचे बेमुदत उपोषण सुरू आहे. बारा दिवस लोटूनही मागण्या सोडविण्याकडे प्रशासन गंभीर नसल्याचे पाहून आज, मंगळवारी दोन महिलांसह चार पुरुष प्रकल्पग्रस्त येथील नगर परिषद आवारातील पाण्याच्या टाकीवर चढले.

कोसंबी गावातील 22 लोकांची 63.62 हेक्‍टर जमीन माणिकगड सिमेंट कंपनीने काही वर्षांपूर्वी चुनखडीच्या उत्खननासाठी संपादित केली. संपादित जमिनीचा मोबदला म्हणून कुटुंबातील एकास नोकरी आणि त्यांचे पुनर्वसन करण्याचे आश्‍वासन कंपनीने दिले होते. मात्र, कित्येक वर्षे लोटून गेले तरी कंपनीने त्यांचे पुनर्वसन केले नाही व नोकरी दिली नाही.
गेल्या 23 जुलैपासून आबीद अली यांच्या नेतृत्वात येथील उपविभागीय कार्यालयासमोर अन्यायग्रस्तांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. उपोषणादरम्यान 18 प्रकल्पग्रस्तांची प्रकृती खालावली. तरीही प्रशासनाने आंदोलनाची दखल घेतली नाही. आज, मंगळवारी साडेदहा वाजताच्या सुमारास संतोष आत्राम, भाऊराव कन्नके, देवराव जुमनाके, मारू येडमे, मायनूबाई कोटनाके, सखूबाई मरस्कोले हे सहा प्रकल्पग्रस्त नगर परिषद आवारातील पाण्याच्या टाकीवर चढले. सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास आमदार ऍड. संजय धोटे यांनी प्रकल्पग्रस्तांशी चर्चा केली व समस्या सोडविण्याचे आश्‍वासन दिले. त्यानंतर प्रकल्पग्रस्त टाकीवरून खाली उतरले.

Web Title: chandrapur news