चंद्रपूर वीजकेंद्र १५ जुलैपासून बंद!

प्रमोद काकडे
रविवार, 1 जुलै 2018

चंद्रपूर - मॉन्सूनचे आगमन झाले असले तरीही पावसाने दडी मारल्यामुळे चंद्रपूरचे इरई धरण जवळपास कोरडे झाले आहे. येत्या १५ दिवसांत पुरेसा पाऊस येऊन धरणातील साठा वाढला नाही, तर १५ जुलैपासून चंद्रपूर वीजकेंद्र बंद करण्याचा मोठा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. याच धरणातून चंद्रपूर शहरालाही पाणीपुरवठा होतो.

चंद्रपूर - मॉन्सूनचे आगमन झाले असले तरीही पावसाने दडी मारल्यामुळे चंद्रपूरचे इरई धरण जवळपास कोरडे झाले आहे. येत्या १५ दिवसांत पुरेसा पाऊस येऊन धरणातील साठा वाढला नाही, तर १५ जुलैपासून चंद्रपूर वीजकेंद्र बंद करण्याचा मोठा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. याच धरणातून चंद्रपूर शहरालाही पाणीपुरवठा होतो.

गेल्या २३ दिवसांत जिल्ह्यात सरासरी १५० मिलिमीटर एवढाच पाऊस झाला. यामुळे मध्यम, लघुप्रकल्पांत ठणठणाट आहे. मागील वर्षी पुरेसा पाऊस न पडल्याने इरई धरण पूर्ण भरले नाही. धरणातील पाण्याची स्थिती लक्षात घेता मार्चपासून वीजनिर्मिती केंद्रातील केवळ तीन-चार संच सुरू आहेत. इरई धरणावर वीजकेंद्र आणि चंद्रपूर शहराचा पाणीपुरवठा अवलंबून आहे.

पिण्यासाठी पाणी शिल्लक राहावे, यासाठी वीजकेंद्राने गेल्या तीन महिन्यांपासून वीजनिर्मितीत कपात केली आणि नऊपैकी केवळ तीन-चार संच सुरू ठेवले. पाऊस न आल्याने धरणाची स्थिती आणखीनच बिकट झाली. केवळ पंधरा दिवस पुरेल एवढाच जलसाठा त्यात शिल्लक आहे. त्यामुळे पाणी वीजनिर्मितीसाठी द्यावे की पिण्यासाठी, असा प्रश्‍न उपस्थित झाला. या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी शनिवारी (ता. ३०) धरणाची पाहणी केली.

वीजसंकटाची शक्‍यता
चंद्रपूर वीजकेंद्राची एकूण निर्मितीक्षमता ३ हजार १३० मेगावॉट आहे. राज्याला लागणाऱ्या विजेपैकी एकूण २० टक्के वीज येथे तयार होते. राज्याची एकूण मागणी सरासरी १५ ते १६ हजार मेगावॉट आहे. चंद्रपूर वीजकेंद्र बंद करायची वेळ आली, तर राज्यालाही मोठ्या वीजसंकटाला सामोरे जावे लागण्याची शक्‍यता आहे. शनिवारी मुंबईवगळता १४ हजार १७२ मेगावॉट वीज वापरली गेली.  

पाणीसाठ्याची सध्याची स्थिती बघता येत्या १५ जुलैपर्यंत पुरेसा पाऊस आला नाही, तर स्थिती आणखी गंभीर होईल. वीजनिर्मिती सुरू ठेवल्यास चंद्रपूर शहराला पाणी मिळणार नाही. त्यामुळे वीजनिर्मिती केंद्र बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 
- आशुतोष सलील, जिल्हाधिकारी, चंद्रपूर 

Web Title: Chandrapur Power Center close