Chandrapur Tiger Attack : वाघाच्या हल्ल्यात महिला ठार, बंदोबस्त करण्यासाठी शूटरला पाचारण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

tiger who attacked on people is still free in chandrapur

Chandrapur Tiger Attack : वाघाच्या हल्ल्यात महिला ठार, बंदोबस्त करण्यासाठी शूटरला पाचारण

व्याहाड खुर्द - शेतात काम करीत असलेल्या महिलेवर शनिवारी वाघाने हल्ला करून ठार केले. पंधरा दिवसाआधी एका महिलेवरही वाघाने हल्ला करून ठार केले होते. सातत्याने अशा घटना घडत असतानाही वनविभागाने काहीच उपाययोजना केल्या नाही. त्यामुळे संतापलेल्या नागरिकांनी वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेचा मृतदेह उचलण्यास नकार दिला होता.

याची दखल घेत वनविभागाने शूटरला पाचारण करून वाघाचा बंदोबस्त करण्याचे आश्वासन गावकऱ्यांना दिले. या आश्वासनावर विश्वास ठेवून साडेपाच तासाने महिलेचा मृतदेह उचलण्यात आला. व्याहाड खुर्द उपवनक्षेत्र अंतर्गत वाघोली बुट्टी या गावातील प्रमिला रोहणकर या शनिवार (ता. २०) सकाळी अकरा वाजताच्या सुमारास आपल्या शेतामध्ये काम करीत होत्या. त्याचवेळी शेतात दबा धरून बसलेल्या वाघाने प्रमिला रोहणकरवर हल्ला करून ठार केले.

पंधरा दिवसांतील ही दुसरी घटना घडल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी मृतदेह उचलण्यास नकार दिला. त्यामुळे गावात काही काळ तणावाचे वातावरण पसरले होते. तणाव वाढत असल्याचे पाहून घटनास्थळी विभागीय वन अधिकारी प्रशांत खाडे, उपविभागीय अधिकारी इंगळे, वनपरिक्षेत्र अधिकारी विरूटकर, ठाणेदार आशिष बोरकर दाखल झाले. यावेळी गावकरी, नातेवाईकासोबत वनविभागाने चर्चा केली.

या चर्चेत त्वरित शूटरला बोलावून दोन दिवसात वाघाला मारण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले. वनविभागाकडून रोहणकर परिवाराला तातडीची दहा लाख रुपयांची मदत दिली. त्यानंतर तब्बल साडे पाच तासांनी अखेर मृतदेह उचलण्यात आला. मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता ग्रामीण रुग्णालय सावली येथे हलविण्यात आले. उत्तरीय तपासणी झाल्यानंतर सायंकाळी साडेसात वाजता मृतदेह नातेवाईकांना देण्याच आला.

या परिसरात वाघाचा मोठ्या प्रमाणावर वावर सुरू आहे. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. शनिवारच्या घटनेनंतर वाघाला पकडण्यासाठी वनविभागाने तीन पिंजरे, ट्रॅप कॅमेरे लावले. या भागात वनविभागातील कर्मचाऱ्यांची गस्त देखील वाढविण्यात आली आहे. वनविभागाने लावलेल्या एका पिंजऱ्यात बिबट आणि त्याचे दोन बछडे जेरबंद झालेत.