देशभरात चंद्रपूरच्या बांबू राखीचे आकर्षण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 ऑगस्ट 2019

चंद्रपूर : इको-फ्रेंडलीच्या नावावर प्लास्टिकची भेसळ असलेल्या राख्या सर्रास विकल्या जातात. पण चंद्रपूरच्या झोपडपट्टी भागात राहणारी बांबू कारागीर महिला आपल्या आदिवासी महिलांचा एक समूह घेऊन शुद्ध रूपात इको-फ्रेंडली राख्या बनविण्याचे काम करीत आहे. यावर्षी त्याला देशभरात पसंती मिळत आहे.

चंद्रपूर : इको-फ्रेंडलीच्या नावावर प्लास्टिकची भेसळ असलेल्या राख्या सर्रास विकल्या जातात. पण चंद्रपूरच्या झोपडपट्टी भागात राहणारी बांबू कारागीर महिला आपल्या आदिवासी महिलांचा एक समूह घेऊन शुद्ध रूपात इको-फ्रेंडली राख्या बनविण्याचे काम करीत आहे. यावर्षी त्याला देशभरात पसंती मिळत आहे.
राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही त्याची प्रशंसा केली आहे. मिनाक्षी मुकेश वाळके यांच्या नेतृत्वात बांबू, लाकडी मणी आणि पेपर वापरून या सुंदर राख्या बनविल्या आहेत. ते धान आणि इतर बियाण्यांपासूनही या राख्या बनवतात. "बांबू म्हणजे कल्पतरू, हिंदू संस्कृतीचं अंग आहे' "निसर्गालाच जपत नाही, राखीलाही त्याचा रंग आहे' या आकर्षक घोषवाक्‍यासह चंद्रपुरात बनलेली राखी सिंगापूर, आईसलॅंड, ऑस्ट्रेलिया सारख्या देशातील भारतीयांनाही भुरळ घालत आहे.
ग्रामीण शेतकरी पार्श्वभूमी असलेल्या मिनाक्षी वाळके आदिवासी महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी काम करतात. एवढेच नव्हे तर येणाऱ्या काळात गरीब व गरजवंतांना स्वस्त आणि मस्त अशी बांबूची इको-फ्रेंडली घरे उपलब्ध करण्याचाही त्यांचा मानस आहे. यासाठी त्या सातत्याने आपल्या बांबू कलेत नवनवे प्रयोग करीत असतात. त्यामुळे स्वतः गरिबीचे चटके सोसूनही त्या या उद्देशाशी प्रामाणिक आहेत. बांबू संदर्भातील कामे करणाऱ्या अनेकांनी त्यांच्या कामाचे कौतुक केले आहे. इजरायल देशातील जेरुसलेमच्या एका आर्ट स्कूलमध्ये बांबूची कार्यशाळा घेण्याचे निमंत्रणही मिनाक्षी यांना याच महिन्यात मिळाले आहे. येणाऱ्या दिवाळी, दसरा, नवरात्री, गणपती, मकरसंक्रांत, चैत्र पौर्णिमा, पोळा, होळी अशा सणासुदीला वेगवेगळे डिझाईन्स आणि कलाकृती बनवीत असल्याची माहिती मीनाक्षी वाळके यांनी दिली.
वनमंत्र्यांनी दिले "बांबूदूत'चे आश्‍वासन
मिनाक्षी वाळके यांच्या सामाजिक जाणीव आणि पर्यावरण पूरक सेवा कार्याचे कौतुक करीत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांना "बांबूदूत' घोषित करण्याचे आश्वासन दिले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chandrapur's Bamboo Rakhi Attractions Across The Country