पालकमंत्री बावनकुळे कामठीतूनच?

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 ऑक्टोबर 2019

नागपूर : राज्याचे ऊर्जामंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे कामठी विधानसभा मतदारसंघातूनच लढणार आहेत. शुक्रवारी (ता.4) ते उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे फलक मतदारसंघात कार्यकर्त्यांनी झळकवले आहेत. सोशल मीडियावरसुद्धा समर्थकांच्या पोस्ट फिरत आहेत. 

नागपूर : राज्याचे ऊर्जामंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे कामठी विधानसभा मतदारसंघातूनच लढणार आहेत. शुक्रवारी (ता.4) ते उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे फलक मतदारसंघात कार्यकर्त्यांनी झळकवले आहेत. सोशल मीडियावरसुद्धा समर्थकांच्या पोस्ट फिरत आहेत. 
भाजपने कामठीची उमेदवारी अद्याप जाहीर केलेली नाही. हा मतदारसंघ चंद्रशेखर बावनकुळे यांचा आहेत. येथून त्यांनी विजयाची हॅटट्रिक साधली आहे. बावनकुळे यांनी केलेली कोट्यवधींची विकासकामे तसेच मोठ्या प्रमाणात संघटन बांधणीमुळे भाजपला सहज विजय मिळवून देणारा हा मतदारसंघ आहे. त्यामुळे येथून दुसऱ्याला उमेदवारी देऊन बावनकुळे यांना काटोल विधानसभा निवडणूक लढवावी असे सांगण्यात आल्याचे कळते. काटोलमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अनिल देशमुख उमेदवार आहेत. त्यांना पराभूत करण्यासाठी पालकमंत्र्यांना पाठवण्यात येणार असल्याचे कळते. मात्र, कामठीतील कार्यकर्ते व त्यांचे समर्थकांनी बावनकुळे यांनाच उमेदवारी द्यावी अशी मागणी केली आहे. माजी राज्यमंत्री तसेच बहुजन रिपब्लिकन एकता मंचच्या अध्यक्ष ऍड. सुलेखा कुंभारे यांनीसुद्धा बावनकुळेच यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी केली आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत याबाबत चर्चाही केली. 
पक्षाने कामठी होल्ड करून ठेवल्याने बावनकुळे नेमके कुठून लढणार असा प्रश्‍न सर्वांना पडला होता. मात्र, कामठी-मौदा विधानसभा मतदारसंघातील उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी भाजपचे अधिकृत उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे चार तारखेला अर्ज भरणार असून सकाळी दहा वाजता कामठी तहसील कार्यालयात सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे बावनकुळे कामठी येथूनच लढणार असल्याचे बोलल्या जात आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: chandrashekahar bawankule