खड्ड्यांसदर्भात वाहतूक विभागाचे दोषारोपपत्र सादर

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नागपूर : रस्त्यावरील खड्ड्यांसदर्भात कनिष्ठ न्यायालयामध्ये दोषारोपपत्र सादर केल्याची माहिती पोलिस उपायुक्त (वाहतूक) चिन्मय पंडित यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली. तसेच, नागरिकांनी 16 ऑक्‍टोबर ते 28 ऑक्‍टोबरच्या काळामध्ये सोशल मीडिया आणि ई-मेलद्वारे एकूण 282 तक्रारी केल्याची माहितीसुद्धा त्यांनी शपथपत्र सादर करीत उच्च न्यायालयाला दिली.
शहरातील रस्त्यावर असलेल्या खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला तर 29 नागरिक जखमी झाले. या घटनांची गंभीरतेने दखल घेत न्यायालयाने स्वतःहून जनहित याचिका दाखल करून घेतली आहे. मागील सुनावणीमध्ये, रस्त्यांवरील खड्ड्यांसंदर्भात नागरिकांनी महापालिका व वाहतूक पोलिस विभागाने उपलब्ध करून दिलेल्या सोशल मीडिया साईट्‌सवर तक्रार दाखल करावी. या तक्रारींची सात दिवसांत संबंधित विभागाने दखल घ्यावी. मुदत संपल्यानंतरही तक्रारीची दखल न घेतल्यास पोलिस विभागाने प्रकरणाच्या चौकशीची सुरुवात करावी. तसेच, चौकशीदरम्यान तीन दिवसांच्या आत संबंधित अधिकारी किवा विभागाविरुद्ध गुन्हा दाखल करावा, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते.
त्यानुसार, वाहतूक पोलिस विभागाने आज शपथपत्र दाखल करीत दोषारोपपत्र सादर केल्याची आणि नागरिकांनी केलेल्या तक्रारींची माहिती त्वरित महापालिकेला दिल्याची माहिती न्यायालयाला दिली. यापूर्वी, रस्त्यावरील खड्डे व टिप्पर चालकाच्या निष्काळजीपणामुळे रस्ते अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. याप्रकरणी टिप्पर चालक व बीएसएनएलच्या खोदकाम ठेकेदाराविरुद्ध लकडगंज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती वाहतूक विभागाने उच्च न्यायालयाला दिली होती. तसेच, विनापरवानगी खोदकाम करून वाहतुकीस धोका निर्माण केल्याबद्दल मंगळवारी झोन येथील पाणीपुरवठा विभागा(ओसीडब्ल्यू)च्या ठेकेदाराविरुद्ध सदर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असेही त्यावेळी नमूद करण्यात आले होते. याप्रकणी 16 ऑक्‍टोबर रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने वरील दोन्ही प्रकरणात 4 नोव्हेंबरपर्यंत दंडाधिकारी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्याचे राज्य सरकारला आदेश दिले होते.
याप्रकरणी न्यायालयीन मित्र म्हणून ऍड. राहिल मिर्झा यांनी कामकाज पाहिले. तर, सरकारतर्फे ऍड. सुमंत देवपुजारी व महापालिकेतर्फे वरिष्ठ विधीज्ञ एस. के. मिश्रा आणि सुधीर पुराणिक यांनी बाजू मांडली.


महापालिकेकडे 342 तक्रारी
खड्ड्यांसदर्भात सोशल मीडियाद्वारे नागरिकांनी 342 तक्रारी केल्याची माहिती महापालिकेने उच्च न्यायालयाला दिली. यापैकी, 57 तक्रारी वगळल्यास इतर तक्रारींवर तातडीने पाऊल उचलत खड्डे बुजविण्यात आले. तर, यापैकी काही ठिकाणी पाणी साचल्यामुळे आणि कामगार दिवाळीच्या सुट्यांवर गेल्यामुळे तक्रारींचे निरसण होऊ शकले नाही. या ठिकाणचे खड्डे येत्या सात दिवसांमध्ये बुजविण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेने उच्च न्यायालयाला दिली.

महापालिकेचे ई-मेल, फेसबुक, ट्विटर आयडी :
ई-मेल ः ngppotholescomplaints@gmail.com, ट्विटर लिंक ः https://.com?ngpnmc आणि फेसबुक लिंक ः https://m.facebook.com/ngpnmc यांचा समावेश आहे.
 
शहर वाहतूक विभागाचे ई-मेल, ट्विटर, व्हॉट्‌सऍप नंबर :
ई-मेल आयडी : dcptrafficnagpur@gmail.com, ट्विटर आयडी : @trafficngp, व्हॉट्‌सऍप क्रमांक : 9011387100

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com