बायोमेट्रिकने मिळणार स्वस्त धान्य

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 डिसेंबर 2016

नागपूर - स्वस्त धान्य दुकानातील काळाबाजार रोखण्यासाठी आगामी तीन महिन्यांत बायोमेट्रिक पद्धतीने स्वस्त धान्य वितरित करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानसभेत प्रश्‍नोत्तराच्या तासात दिली.

नागपूर - स्वस्त धान्य दुकानातील काळाबाजार रोखण्यासाठी आगामी तीन महिन्यांत बायोमेट्रिक पद्धतीने स्वस्त धान्य वितरित करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानसभेत प्रश्‍नोत्तराच्या तासात दिली.

अंत्योदय योजनेसंदर्भातील निकृष्ट दर्जाच्या गहू पुरवठ्यावर आमदार अमित घोडा यांनी प्रश्‍न उपस्थित केला होता. आमदार राजेश टोपे यांच्यासह इतर सदस्यांनी रेशन दुकानांमध्ये होणाऱ्या काळ्या बाजाराकडे लक्ष वेधले. प्रश्‍नाला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले,""प्रत्येक स्वस्त धान्य दुकानात "पीओएस' यंत्र लावण्यावर सरकारचा भर आहे. त्यासंबंधीची निविदाही मंजूर करण्यात आली आहे. याशिवाय सर्व शिधापत्रिकाधारकांना आधार कार्डने जोडण्याचे काम सुरू आहे. त्यासंदर्भात काम सुरू असून लवकरच ते पूर्ण होईल. राज्यात एक कोटी नागरिकांच्या शिधापत्रिका बनावट असून, तो आकडा दीड कोटींवर जाण्याची शक्‍यता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यात सुधारणा करण्याची अत्यंत गरज आहे म्हणूनच आधार कार्ड आणि शिधापत्रिकेवरील नावे तपासून पहिली आहेत. जेणे करून योग्य आणि गरजू व्यक्तीला धान्याची सुविधा मिळावी. धान्याचा काळाबाजार रोखण्यासाठी प्रत्येक स्वस्त धान्याच्या दुकानात "पीओएस' यंत्र जोडून सरकारकडून मिळणाऱ्या आणि वितरित होणाऱ्या धान्याचे हिशेब ठेवणार आहे. यामुळे नेमके किती कमिशन दुकानदारांना मिळते हे कळेल. ही योजना पूर्ण होताच दुकानदारांचे कमिशन वाढविण्यावर भर देण्यात येईल, तशी चर्चा दुकानदारांच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Cheap biometric get grain