३.५७ कोटींनी फसवणूक

Money
Money

नागपूर - दामदुपटीच्या परताव्याचे प्रलोभन दाखवून गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक केल्याचे आणखी एक प्रकरण पुढे आले. या प्रकरणात आरोपींनी प्रथम सरकारी कंत्राट मिळाल्याचा देखावा करीत देशभर जाळे पसरविले. त्यानंतर दहा महिन्यांमध्ये दुप्पट पैसे देण्याचे आमिष दाखवून रक्कम गोळा केली. आतापर्यंत ३.५७ कोटींच्या फसवणुकीची बाब पुढे आली असून, सदर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. 

आकाश सरोदे (४०) रा. वैशालीनगर आणि अभिजित देव (३२) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांनी गोंडवाना चौक, छावणी येथे माय डायल डिजीटल एलईडी ॲण्ड मीडिया प्रा. लि. नावाची कंपनी सुरू केली. देशभरात त्यांनी कंपनीचे एजंट नियुक्त केले. त्यांच्या कंपनीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या संकल्पनेतील स्मार्टसिटीअंतर्गत कंत्राट मिळाले असून, प्रत्येक शहरात मोठ्या टीव्हीवर डिजिटल जाहिरात प्रसारण केल्याचा देखावा त्यांनी निर्माण केला. या कामासाठी मोठ्या रकमेची गरज असून, गुंतवणूक करणाऱ्यांना १० महिन्यांमध्ये २० टक्‍क्‍यांप्रमाणे दुप्पट रक्कम परत करण्याचे आमिष दाखविले. तसेच नातेवाईक आणि परिचितांना गुंतवणुकीस बाध्य केल्यास वेगळे कमिशन देण्याची तयारी दर्शविली. ३ नोव्हेंबर २०१७ ते २३ जुलै २०१८ दरम्यान आरोपींनी पैसे गोळा केले. 

डेहरादूनच्या शाहनगर येथील रहिवासी पार्वती सूरजमणी चमोली (२८) या महिलेने व तिच्या नातेवाईकांनी ५२ लाख ५६ हजार रुपये गुंतविले. काही दिवस त्यांना  व्याजही मिळाले. त्यानंतर पैसे मिळणे बंद झाले. जुलै २०१८ मध्ये पार्वती चमोली नागपूरला आल्या असता त्यांना छावणी येथील कार्यालयाला कुलूप दिसले. त्यांनी आकाश आणि अभिजित यांच्या मोबाईलवर संपर्क केला असता त्यांचे मोबाईलदेखील बंद होते. चमोली यांच्याप्रमाणेच अन्य गुंतवणूकदारांनाही तोच अनुभव आला. उत्तराखंड, महाराष्ट्र, प. बंगाल, उत्तर प्रदेश येथील गुंतवणूकदारांची ३ कोटींवर गुंतवणूक केल्याचे आतापर्यंत पुढे आले. पार्वती चमोली यांच्या तक्रारीवरून सदर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

टीव्ही विक्रेत्यांनाही फटका
आरोपींनी टीव्ही विक्रेत्यांचीही फसवणूक केल्याचे पुढे आले. सरकारी कंत्राट मिळाल्याची बतावणी करीत त्यांनी दुकानदारांकडून ५६ लाख ५० हजार ५०० रुपयांचे एलईडी टीव्ही खरेदी करून त्यांचीही फसवणूक केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com