अविवाहित असल्याचे सांगून तिघींशी लग्न

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 डिसेंबर 2018

नागपूर : "शादी डॉट कॉम' या ऑनलाइन विवाह संकेतस्थळावर अविवाहित असल्याचा "फेक आयडी' तयार करून तीन महिलांशी लग्न करून त्यांचे शोषण केले. तसेच त्यांच्याकडून पैसे उकळून फसवणूक केल्याप्रकरणी आरोपीविरुद्ध हुडकेश्‍वर पोलिसांनी गुन्हा दाखल करीत युवकाला अटक केली. अमित प्रवीण घरडे (वय 35, रा. सुदर प्लाझा, घुग्गुस रोड, चंद्रपूर) असे आरोपीचे नाव आहे.

हुडकेश्‍वरमधील पीडित 30 वर्षीय तरुणीचा पहिल्या पतीसोबत घटस्फोट झाला होता. तिने जानेवारी 2018 मध्ये "शादी डॉट कॉम'वर विवाह नोंदणी केली. यावरून आरोपी अमितशी तिचा फोनवरून संपर्क झाला. अमितने स्वतःला अविवाहित असल्याचे दर्शविले होते. फोनवरून संभाषणादरम्यान अमितने लग्न झाल्याचे मान्य करीत पहिल्या पत्नीशी घटस्फोट होऊन मूल झाले नसल्याचे तरुणीला सांगितले. तसेच त्याच्या पत्नीनेसुद्धा दुसरे लग्न केल्याचे सांगितले. त्यानंतर पीडित तरुणी आणि आरोपी अमित यांच्यात जवळीक वाढली. दरम्यान, त्याचे शारीरिक संबंध निर्माण झाले. पीडित तरुणीने आरोपी अमितला लग्नाबाबत विचारले असता त्याने नंतर नकार दिला. पीडित तरुणीने तरुणाविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार करण्याची धमकी दिल्यानंतर त्याने शेवटी लग्न करण्यास होकार दिला. दोघांनीही लग्न केले.

पीडित तरुणीला वेगवेगळे कारण सांगून त्याने तिच्याकडून 1 लाख रुपये उकळून तिची फसवणूक केली. तरुणीने हुडकेश्‍वर पोलिस स्टेशन गाठून तक्रार दिली. पोलिसांनी अमित घरडेला अटक केली.

तीन महिलांना फसवले
अमितने "शादी डॉट कॉम'वर हुडकेश्‍वरमधील तरुणीशी लग्न केल्यानंतर पुन्हा एक फेक आयडी बनविला. त्याआधारे आणखी दोन मुलींना घटस्फोटित असल्याचे सांगून लग्न केले. त्यांचेही लैंगिक शोषण केले. त्या मुलींकडून पैसा उकळून फसवणूक केली. तक्रारीवरून पोलिसांनी तपासाचा छडा लावत 12 तासाच्या आत आरोपीला अटक केली. तपासात त्याने पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट न घेता पीडितेला जाळ्यात ओढले. त्यानंतर पुन्हा पीडितेसोबत घटस्फोट न घेता तिसऱ्या मुलीशी त्याने संपर्क साधून लग्न केले. अशाप्रकारे त्याने तीन तरुणींना लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचे उघडकीस आले.

Web Title: Cheating Marriage Crime