शेफ विष्णू मनोहर यांचा 53 तास स्वयंपाकाचा विश्‍वविक्रम

नितीन नायगावकर 
रविवार, 23 एप्रिल 2017

आज (रविवार) सायंकाळी 5.30 वाजता त्यांनी कुकिंग मॅराथॉनला पूर्णविराम दिला. या प्रवासाचा एकूण कालावधी साडेसत्तावन्न तास एवढा होता. मात्र, नियमानुसार प्रत्येक तासाला पाच मिनिटे या अनुशंगाने 285 मिनिटे (जवळपास साडेचारतास) त्यांना विश्रांती घेता येणार होती. त्यामुळे विश्रांतीचा कालावधी वगळून 53 तासांच्या विश्‍वविक्रमावर विष्णू मनोहर यांनी मोहर उमटवली.

नागपूर : अमेरिकेचे बेंजामिन पेरी यांचा सलग 40 तास स्वयंपाकाचा विश्‍वविक्रम मोडीत काढून सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी आज (रविवार) 53 तासांचा नवा विश्‍वविक्रम नोंदवला.

नागपूर येथील इन्स्टीट्यूट ऑफ इंजिनियर्सच्या सभागृहात त्यांनी हा विक्रम रचला. गिनेस वर्ल्ड रेकॉर्डमध्ये लवकरच त्यांचे नाव नोंदविण्यात येईल. विष्णू मनोहर यांनी शुक्रवारी सकाळी 8 वाजता 52 तासांचे लक्ष्य ठेवून हा प्रवास सुरू केला. एक हजारांपेक्षा अधिक पदार्थ तयार करण्याचा निर्धार त्यांनी केला होता. मात्र, विश्‍वविक्रम तासांच्या आधारावर रचायचा असल्यामुळे त्यांनी त्यावरच लक्ष केंद्रीत केले आणि साडेसातशे पदार्थ तयार केले.

आज (रविवार) सायंकाळी 5.30 वाजता त्यांनी कुकिंग मॅराथॉनला पूर्णविराम दिला. या प्रवासाचा एकूण कालावधी साडेसत्तावन्न तास एवढा होता. मात्र, नियमानुसार प्रत्येक तासाला पाच मिनिटे या अनुशंगाने 285 मिनिटे (जवळपास साडेचारतास) त्यांना विश्रांती घेता येणार होती. त्यामुळे विश्रांतीचा कालावधी वगळून 53 तासांच्या विश्‍वविक्रमावर विष्णू मनोहर यांनी मोहर उमटवली. तीन दिवस सभागृहात त्यांच्या चाहत्यांनी हाऊसफुल्ल गर्दी केली होती. सांस्कृतिक, सामाजिक, वैद्यकीय आदी क्षेत्रांमधील 250 कार्यकर्ते शिफ्टनुसार सभागृहात विविध उपक्रमांच्या माध्यमातून विष्णू मनोहर यांचे प्रोत्साहन वाढवत होते.

मैत्री परिवाराने या उपक्रमाचे संयोजन केले. गाणी, कविता, भजन, पारायण, शेरो-शायरी आणि गप्पांच्या माध्यमातून पूर्णवेळ सभागृहात "हॅपनिंग' वातावरण ठेवण्याचा सर्वांनी प्रयत्न केला. सायंकाळी साडेपाच वाजता विश्‍वविक्रम रचला गेला त्यावेळी सभागृहात एकच जल्लोष झाला. ढोल ताशाचा गजर, "विष्णू मनोहर यांचा विजय असो' यासारख्या घोषणा आणि टाळ्यांच्या कडकडाटाने परिसर दुमदुमला होता.

Web Title: chef vishnu manohar sets world record

व्हिडीओ गॅलरी