देवीच्या मंदिरावर रासायनिक प्रक्रिया

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 नोव्हेंबर 2019

- कालंका देविचे मंदिर टाकणार कात! 
- बार्शीटाकळी येथे औरंगाबादची टीम करणार काम
- 1177 मध्ये कोरीव बांधकाम

अकोला : बार्शीटाकळी येथील काळ्या दगडांपासून निर्मित कालंका देविचे मंदिर व मूर्तिचे जतन करण्यासाठी रासायनिक प्रक्रिया करण्यात येणार आहे. औरंगाबाद येथील भारतीय पुरातत्व विभागाची केमिकल टीम (ब्रांच) ही प्रक्रिया पार पाडेल. प्रक्रियेनंतर मंदिराची दशा बदलेल व ते दीर्घ काळापर्यंत सुरक्षित सुद्धा राहिल. 

अकोला शहरापासून 15 ते 17 किलोमीटर अंतरावर असलेल्या बार्शीटाकळी शहरात अकराव्या शतकात काळ्या दगडांपासून कालंका देवीचे मंदिर बनवण्यात आले होते. एप्रिल 1177 मध्ये हे मंदिराचे बांधकाम करण्यात आल्याचे पुरावे उपलब्‍ध आहेत. मंदिरात कायम सूर्यप्रकाश राहावा अशा प्रकारचे बांधकाम करण्यात आले आहे. मंदिरात प्रवेश करण्यासाठी लहानसा दरवाजा आहे. मंदिराच्या आत व बाहेरील भिंतीवर अप्रतिम कोरीव काम करण्यात आले आहे. मंदिराचे प्रवेशद्वार छोटे असून चार मोठ्या खांबावर मंदिराचा डोलारा उभा आहे. मंदिराच्या दगडांवर रामायण व महाभारत काळातील दृष्यांचे कोरीव नक्शीकाम करण्यात आले आहे. गत काही वर्षांपासून सदर मंदिराची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. त्यामुळे मंदिराचे संवर्धन करण्यासह त्याचे सौंदर्य कोरीव काम टिकून राहावे यासाठी याठिकाणी रासायनिक प्रक्रिया करण्यात येणार आहे, अशी माहिती भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या अकोला विभागाचे संरक्षण सहाय्यक एस.ए. महाजन यांनी दिली आहे. 

मंदिर बनवण्यासाठी अखंड दगडांचा वापर
बार्शीटाकळी येथील कालंका देविच्या मंदिरातील काळ्या दगडांवर काेरीव काम करण्यात आले आहे. त्यामधील काही दगड अखंड आहेत तर काही दगडांच्या तुकड्यांवर नक्शीकाम करण्यात आले आहे. या दगडांवर देवी, देवतांचे मुखवटे अतिशय सुंदररित्या कोरण्यात आले आहेत. काही दगडांवर आतून व बाहेरुन कोरीव काम करण्यात आल्याने मंदिराला एतिहासिक वारसा लाभला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chemical process at the temple of the goddess