चेन्नईची "शेट्टी गॅंग' पोलिसांच्या जाळ्यात 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 मे 2018

नागपूर - चेन्नईतील कुख्यात "शेट्टी गॅंग'च्या 3 सदस्यांच्या अजनी पोलिसांनी मुसक्‍या आवळल्या. या टोळीने नागपूर शहरात 7 गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. टोळीच्या म्होरक्‍यासह अन्य 5 सदस्य फरार असून पोलिस त्यांचा शोध घेताहेत. फरार आरोपींच्या अटकेनंतर आणखी काही प्रकरण समोर येण्याची शक्‍यता आहे. 

नागपूर - चेन्नईतील कुख्यात "शेट्टी गॅंग'च्या 3 सदस्यांच्या अजनी पोलिसांनी मुसक्‍या आवळल्या. या टोळीने नागपूर शहरात 7 गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. टोळीच्या म्होरक्‍यासह अन्य 5 सदस्य फरार असून पोलिस त्यांचा शोध घेताहेत. फरार आरोपींच्या अटकेनंतर आणखी काही प्रकरण समोर येण्याची शक्‍यता आहे. 

अटकेतील आरोपींमध्ये प्रभू सुब्रमण्यम सनिपती (32), व्यंकटेश वेल्येदन कोरवन (54) आणि मुरली ऊर्फ रोशन परसरामन किल्लन (26) यांचा समावेश आहे. तिन्ही आरोपी वेल्लोर आणि गुंटूर येथील रहिवासी आहेत. 5 आरोपी पोलिसांच्या छापा कारवाईपूर्वीच फरार झाले. आरोपी 4 महिन्यांपासून मानेवाडा मार्गावर महाकालीनगरमध्ये भाड्याच्या खोलीत राहात होते. मागील काही महिन्यांपासून ठाण्यांतर्गत घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. यामुळे पोलिस आरोपींच्या शोधात होते. 4 मेच्या पहाटे तीनच्या सुमारास पोलिस पथक सुयोगनगर परिसरात गस्तीवर होते. दरम्यान, 4 जण पोलिसांना पाहून पळू लागले. पोलिसांना त्यांच्यावर संशय आला. त्यांनी पाठलाग करून यातील तिघांना पकडले. आरोपींच्या खोलीतून चेन्नईचे आठ जणांचे रेल्वे तिकीट सापडले आहेत. या टोळीवर चंद्रपुरात घरफोडीचे 15 गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यात अटक झाल्यानंतर काही दिवसांपूर्वीच आरोपी मध्यवर्ती कारागृहातून सुटले आहेत. या टोळीचे कार्यक्षेत्र आठ ते दहा राज्यांपर्यंत असल्याची माहिती आहे. 

ही कारवाई उपायुक्त नीलेश भरणे यांच्या मार्गदर्शनात वपोनि शैलेश संखे, एपीआय संदीप धोबे, एन. बी. गावंडे, पीएसआय सुमेध बन्सोडे, भुते, पोहवा रामचंद्र कारेमोरे, अनिल ब्राम्हणकर, सुरेश शेंडे, रतन बगडे, नीलेश्वर तितरमारे, शैलेश, प्रशांत आणि मनोज यांनी केली. 

2.80 लाखांचा माल जप्त 
एक दिवसापूर्वीच आरोपींनी अभयनगरातील हर्षल मांजरे यांच्या घरात चोरी केली होती. मांजरे यांच्या घरातील सामान आरोपींकडे आढळून आले. न्यायालयातून आरोपींची पोलिस कोठडी घेऊन त्यांची सखोल चौकशी करण्यात आली. आरोपींनी अजनी ठाण्यांतर्गत 5 आणि हुडकेश्वर ठाण्यांतर्गत 2 ठिकाणी चोरीची कबुली दिली. आरोपींकडून आतापर्यंत 3 दुचाकी वाहन, दागिने आणि इतर सामान असा एकूण 2.80 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

मुंबई-पुणे-नागपूर टार्गेट 
शेट्‌टी गॅंगच्या मुंबई, पुणे आणि नागपूर ही शहरे टार्गेटवर होती. प्रत्येक शहरात जवळपास चार महिने राहून चोरी-घरफोडी आणि अन्य गुन्हे करायचे. चोरलेला माल घेऊन चेन्नई गाठून कुटुंबीयांसोबत महिनाभर राहायचे. तीन आरोपींकडून महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांना मिळाले असून, अन्य राज्यांतही चोरी करणारी मोठी गॅंग पोलिसांच्या हाती लागण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. 

Web Title: Chennai Shetty Gang police trap