छत्रपतीनगर चौक उड्डाणपूल इतिहासजमा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 नोव्हेंबर 2016

नागपूर- गेली दीड दशके नागपूरकर चाकरमाने, राजकारणी, खेळाडू, अभिनेते यांच्या प्रवासाचा साक्षीदार ठरलेला छत्रपतीनगर चौकातील उड्डाणपूल इतिहास जमा झाला. भावी पिढीला येथे कधी काळी उड्डाणपूल होता, हे सांगण्यासाठी पाचपैकी दोन पिलर स्मृती म्हणून कायम ठेवण्यात येणार आहे. इतर तीनपैकी आज शेवटचा पिलर पाडताच चारशे मीटर लांबीचा हा उड्डाणपूल शहराचा भूतकाळ झाला.

नागपूर- गेली दीड दशके नागपूरकर चाकरमाने, राजकारणी, खेळाडू, अभिनेते यांच्या प्रवासाचा साक्षीदार ठरलेला छत्रपतीनगर चौकातील उड्डाणपूल इतिहास जमा झाला. भावी पिढीला येथे कधी काळी उड्डाणपूल होता, हे सांगण्यासाठी पाचपैकी दोन पिलर स्मृती म्हणून कायम ठेवण्यात येणार आहे. इतर तीनपैकी आज शेवटचा पिलर पाडताच चारशे मीटर लांबीचा हा उड्डाणपूल शहराचा भूतकाळ झाला.

मेट्रो रेल्वेच्या डबल डेकर पुलाच्या निर्मितीसाठी छत्रपतीनगर चौकातील उड्डाणपूल पाडणे आवश्‍यक झाले होते. अनेक पर्यायानंतर उड्डाणपूल पाडण्याचा अंतिम पर्यायावर शिक्कामोर्तब झाले होते. गेल्या आठ दिवसांपासून उड्डाणपूल पाडण्यासाठी मेट्रो रेल्वेचे तज्ज्ञ अभियंते, कंत्राटदार, कुशल, अकुशल कामगार असे दोनशे जणांचे पथक व तेवढ्याच ताकदीची यंत्रणा राबत आहे. कॉम्बिक्रशर, जेसीबी, फवारा, डायमंड क्रशर आदी यंत्रणेच्या माध्यमातून आठ दिवसांत उड्डाणपूल भुईसपाट करण्यात मेट्रो रेल्वे प्रशासनाला यश आले. उड्डाणपुलाचे विविध भाग तोडताच जमा झालेला मलबा तत्काळ हलविण्यात आल्याने छत्रपतीनगर चौक आता 20 वर्षांपूर्वीच्या मोकळ्या स्थितीत दिसून येत आहे. आता केवळ शिल्लक राहिलेला थोडाफार मलबा शिल्लक असून रात्रभरात संपूर्ण परिसर मोकळा होईल. दरम्यान, साई मंदिर परिसरा मेट्रो रेल्वेच्या डबल डेकर पुलासाठी प्रस्तावित जागा वगळता रस्त्याचे डांबरीकरणाचे कामही सुरू करण्यात येणार असून या जागेची स्वच्छता करताना कर्मचारी आढळून आले. त्यामुळे येत्या तीन दिवसांत छत्रपतीनगर चौकाला पूर्वीचेच स्वरूप येणार असून वाहतूक सुरू होण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे.

सलग 180 तास प्रक्रिया
15 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून छत्रपतीनगर चौक उड्डाणपूल पाडण्यास प्रारंभ झाला. आज सायंकाळपर्यंत सलग 180 तास उड्डाणपूल पाडण्याचे काम अविरत सुरू होते. पहिल्या दिवशी उड्डाणपुलाचे सहाही स्लॅब पाडण्यात आले. त्यानंतर स्लॅबचे तुकडे करण्यात आले. त्याचदरम्यान उड्डाणपुलाच्या दोन्ही रॅम्पमधील माती, दगड काढण्यात आले. गेल्या तीन दिवसांत उड्डाणपुलाचे पाचपैकी तीन पिलर डायमंड क्रशरच्या साहाय्याने पाडण्यात आले. आज सकाळी रॅम्पच्या दोन्ही भिंती भुईसपाट करून त्याचे मलब्यात रूपांतर करण्यात आले.

Web Title: Chhatrapati Nagar Chowk flyover of the past