छत्रपतींचा आदेश देतो पर्यावरण संवर्धनाचा संदेश

नागपूर : ज्येष्ठ चित्रकार रमेश सातपुते यांच्या "कलावैभव' या घरी असलेले आज्ञापत्र.
नागपूर : ज्येष्ठ चित्रकार रमेश सातपुते यांच्या "कलावैभव' या घरी असलेले आज्ञापत्र.

नागपूर : शिवशाहीत वास्तूनिर्मितीसाठी होणारा लाकडाचा उपयोग प्रचंड मोठ्या प्रमाणात होता. लोक जंगलातील सागवान तोडून त्याचा वास्तूनिर्मितीत उपयोग करीत होते. काही मंडळी पूर्वजांनी जपलेली अंगणातील वृक्षदेखील तोडत. अशा रयतेला छत्रपती शिवाजी महाराजांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला होता. त्यांनी प्रसिद्ध केलेले आज्ञापत्र आजही छत्रपतींच्या पर्यावरणप्रेमाची साक्ष देतो.

कायमच हिरव्यागार बागेने स्वागत करणाऱ्या गिरीपेठेतील सातपुतेंच्या "कलावैभव' या घरी ज्येष्ठ चित्रकार रमेश सातपुते यांच्या ठेव्यात हे आज्ञापत्र आहे. श्रीमंत धनवटेंची कन्या असलेल्या रमेश सातपुतेंच्या आई शकुंतला सातपुते यांचे सहा महिन्यांपूर्वी निधन झाले. त्या जे जे स्कूल ऑफ आर्टसच्या सुवर्णपदक विजेत्या होत्या. त्यांचा 150 वर्षे जुन्या सोने, चांदी, पितळेच्या वस्तूंचा संग्रह प्रसिद्ध असून, सातपुतेंच्या आजोबांना इंग्रजांकडून मिळालेली तलवार, तांबे-पितळेचे पाण्याचे हंडे, अल्लादिनचा चिराग, मसाल्याचे, पानांचे डबे, विविध आकाराचे अडकित्ते, कुलपे, देवघर, फोटोफ्रेम, इस्त्री, दागिन्यांचे डबे अशा अनेक वस्तू त्यांच्या संग्रहालयात आहेत. याच संग्रहालयात कोणाच्याही निदर्शनात येईल असे हे आज्ञापत्र ठेवण्यात आले असून, छत्रपती शिवाजी राजांनी रयतेला दिलेला आदेश यात ठळकपणे दिसतो. सुमारे चाळीस वर्षे जुने असलेले हे आदेशाचे पत्र तत्कालीन राज्य सरकारने प्रकाशित केले होते, असे रमेश सातपुते यांनी सांगितले.

"धन्यास राजी करून द्रव्य देऊन न्याच्या संतोषे न्यावे'
आदेशात, आंब्याची अथवा फणसाची झाडे घरे बांधण्यासाठी उपयोगात येतील मात्र एकदा तोडली की, पुढे एक दोन वर्षात मिळणार नाहीत इतकी जाण रयतेने ठेवावी अशी आज्ञा छत्रपतींनी केली आहे. जंगलातील सागवानाची झाडे परवानगी घेऊन तोडावी. पूर्वजांनी अंगणातील झाडे लेकरांप्रमाणे वाढवली असून, शक्‍यतोवर त्यास हात लावू नका असादेखील आदेश यात नमूद आहे. जर एखादे झाड जीर्ण झाले असेल तर "धन्यास राजी करून द्रव्य देऊन न्याच्या संतोषे न्यावे' अर्थात मालकाशी बोलून गरज पडल्यास किंमत मोजून ते विकत घ्यावे असे छत्रपती या आदेशात म्हणतात.
विशेष म्हणजे संगीतप्रेमी असलेल्या सातपुतेंनी साडेआठ हजार दुर्मीळ गाण्यांच्या रेकॉर्डसचा संग्रह केला असून, त्यांच्याकडे शिव किल्ल्यांची माहिती देणाऱ्या साडेसहा हजार पुस्तकांचा संग्रह आहे. शिवकाळातील अनेक पुस्तके प्रकाशित झाली. छत्रपती शिवाजी राजांच्या जीवनावर प्रकाश टाकणारेदेखील साहित्य आहे. पण किल्ल्यांची बांधणी, तटबंदी, बुरूज, गोमुखी दरवाजे अशा सर्वच वास्तूकलेविषयी माहिती देणारे पुस्तके नाहीत. अशाच काही दुर्मीळ पुस्तकांचा संग्रह रमेश सातपुते यांनी केला आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com