मुख्यमंत्र्यांनी साधला पाच तालुक्‍यांतील सरपंचांशी संवाद

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 मे 2019

चंद्रपूर ः जिल्ह्यातील पाच तालुक्‍यांमध्ये पाणीटंचाईची समस्या व दुष्काळ निवारण्यासाठी आवश्‍यक उपाययोजना करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (ता. 13) दिलेत. त्यांनी पाच तालुक्‍यांतील सरपंचांशी थेट मंत्रालयातून संवाद साधला.

चंद्रपूर ः जिल्ह्यातील पाच तालुक्‍यांमध्ये पाणीटंचाईची समस्या व दुष्काळ निवारण्यासाठी आवश्‍यक उपाययोजना करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (ता. 13) दिलेत. त्यांनी पाच तालुक्‍यांतील सरपंचांशी थेट मंत्रालयातून संवाद साधला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज "ऑडिओ ब्रीज सिस्टिम'मार्फत जिल्ह्यातील सरपंचांशी मोबाईलवरून थेट संवाद साधून त्यांच्याशी दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांसंदर्भात चर्चा केली. राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर गेल्या चार वर्षांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट जनतेशी संपर्क साधण्यावर भर दिला आहे. आज टंचाई जाणवणाऱ्या भागातील नेमकी परिस्थिती काय आहे, प्रशासन कुठे मागे आहे, समस्या सोडविण्यासाठी काय करता येईल, याबाबत थेट सरपंचांशी संवाद साधण्यावर त्यांनी भर दिला.
गावागावांतील नळयोजना योजनेसंदर्भातील समस्या, पाण्याचे स्त्रोत असणाऱ्या नद्यांची समस्या, विहिरी, इंधन विहिरींची समस्या, फ्लोराइडयुक्त पाण्याची समस्या याबाबत सरपंचांनी आपले मत निर्भयपणे या संवादातून मांडले. जिल्ह्यातील नागभीड, चिमूर, सिंदेवाही, राजुरा, ब्रह्मपुरी तालुक्‍यांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला आहे. अनेक ठिकाणी पाण्याची टंचाई पुढे आली आहे. मात्र, बहुतेक ठिकाणी तांत्रिक अडचणीमुळे पाणीपुरवठा खंडित आहे. तथापि, पाइपलाइन फुटणे, नळयोजनेच्या विहिरीला पाणी नसणे, वीजदेयके प्रलंबित असणे, जुन्या पाणीपुरवठा योजनेचे पुनरुज्जीवन करणे, रोजगार हमीच्या कामाची सुरुवात करणे आदी समस्या यावेळी सरपंचांनी मांडल्या. या विशेष बैठकीला उपस्थित जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डीले, मनपाचे आयुक्त संजय काकडे, निवासी उपजिल्हाधिकारी घनश्‍याम भुगावकर यासह अन्य अधिकारी ऑडिओ ब्रीज सिस्टिममार्फत जोडले गेले होते. या सर्व अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या. यावेळी काही सरपंचांनी कुशल कामाचे पैसे मिळत नसल्याची तक्रार केली. रोहयोअंतर्गत करावयाच्या कुशल कामाचे पैसे लवकरच मिळतील, असे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chief Minister addressed the sympathizers of five talukas