मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचा बट्ट्याबोळ

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचा बट्ट्याबोळ

हिवरखेड  :  मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचा निव्वळ बट्ट्याबोळ झाल्याने योजनेला भ्रष्टाचाराने पोखरले असल्याचे चित्र दिसत आहे. या योजनेत कार्य करणाऱ्या संबंधित यंत्रणेचे हात ओले झाले असण्याची चर्चा नागरिकांमध्ये चांगलीच रंगत आहे. अत्यंत निकृष्ट कामानंतरही लोकप्रतिनिधी मूग गिळूण गप्प असल्याने वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत.

हेही वाचा - खामगाव हायवेवर एसटी बस-ट्रकमध्ये अपघात, 26 प्रवासी जखमी
वर्कऑर्डर संपूनही अनेक कामे प्रलंबीत

ग्रामीण भागाला पक्क्या दर्जेदार रस्त्यांनी जोडले जावे, दुर्गती झालेल्या रस्त्यांचे पुनर्जीवन करून सर्व खेड्या गावांना विकासगंगेशी जोडावे अशा उदात्त हेतूने मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेवर करोडो रुपये शासन खर्च करत आहे. सध्या तेल्हारा तालुक्यात अनेक रस्त्यांची कामे या योजनेअंतर्गत होत असून, ही कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची होत आहेत. सोबतच अनेक अनियमितता निदर्शनास येत आहेत. हिवरखेड-सोनवाडी, गोर्धा-हिंगणी-दानापूर, बेलखेड-लोहारी, रायखेड- चांगलवाडी, दानापूर- वारखेड, तेल्हारा- गाडेगाव रस्ता यामध्ये प्रमुख उदाहरणे आहेत. काही चांगले अपवाद वगळता यापैकी अनेक रस्त्यांमध्ये वर्कऑर्डर कालावधी संपला तर काहीचा संपत आहे तरीही अनेक कामे अपूर्णच आहेत. त्यामधील अनेक पुलांची कामे सुरूच झाली नाहीत. तर काहींचा श्रीगणेशा झाला आहे. डांबरी रोड असतानाही पाण्यामुळे खराब होऊ नये म्हणून गावांतर्गत काँक्रीट रस्ते केले जातात. अनेक गावांमध्ये हे रस्ते सुरूच झाले नाहीत. आणि जे झाले त्यामध्ये कटिंग, ब्रेकिंग न केल्यामुळे उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात तडे मारण्याची शक्यता आहे. वर्कऑर्डर संपूनही काँक्रिटीकरणाची ९० टक्के कामे प्रलंबीत आहेत.


काम पूर्ण होण्याआधीच पॅचेसची नामुष्की
गोर्धा-दानापूर रस्त्यावरील आस नदीवरील मोठ्या पुलाच्या कामात दिवसाढवळ्या मातीचा मोठ्या प्रमाणात वापर करण्याचा प्रताप संबंधित कंत्राटदाराकडून होत असल्याने हा पूल किती दिवस टिकेल? असा प्रश्न निर्माण झाला आहे. पूर्ण रस्त्याचे अंदाजपत्रक असतानाही एक किमी आधीचा रस्ता थोडा चांगला असल्याने एक किमी नवीन रस्ता न करता तसाच सोडून देण्याचा धक्कादायक प्रकार दिसत आहे. रस्त्यावरील पाणी योग्य दिशेने जावे म्हणून पाईप टाकले जातात. परंतु, त्याचा वापर केला नसल्याचा आरोप परिसरातील शेतकरी करीत आहेत. महत्त्वाचे म्हणजे डांबरीकरणाच्या दोन्ही बाजूला प्रत्येकी दोन मीटरपर्यंत चार इंचाचे साईड शोल्डर प्रेसिंग करावे लागते ते साईड शोल्डर अनेक रस्त्यांवर अदृश्य आहेत. गोर्धा-दानापूर रस्ता पूर्ण होण्याआधीच जेवढा झाला आहे त्यापैकी २५ टक्के रस्ता खराब झाला आहे. रस्ता पूर्ण होण्याआधीच पॅचेस भरण्याची नामुष्की कंत्राटदारावर आली आहे.


येथे क्लिक करा - अबब... चोरट्यांकडून तब्बल 56 मोबाईल जप्त
पालमंत्र्यांच्या दरबारात जाणार प्रकरण

हिवरखेड-सोनवाडी रस्त्याच्या चार-पाच पुलांचे काम वर्कऑर्डर संपली तरी देखील कामला सुरुवात करण्यात आली नाही. तर बेलखेड-अकोली-लोहारी रस्त्याची वर्कऑर्डर संपूनही पुलांचे काम, साईड शोल्डरचे काम, आणि इतरही अनेक कामे अपूर्णच आहेत. दानापूर-वारखेड या रस्त्याच्या सीलकोटमध्ये डांबराचे प्रमाण अत्यंत कमी वापरल्याने रस्ता टीकण्यासाठी सर्वात महत्त्वपूर्ण असलेला सीलकोट जवळपास पूर्णतः उखडला असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे रस्त्याचा दर्जा किती निकृष्ट आहे हे कोणीही सांगू शकते. रस्त्यांच्या पुलाच्या प्रमाणात रस्त्याची उंची न मिळविल्याने पाणी प्रवाह बदलण्याची दाट शक्यता आहे. रस्त्यांची उंची पुलाच्या प्रमाणात मिळविण्यासाठीचे साहीत्य मोठ्या प्रमाणात वापरले नसल्याचे निदर्शनास येत आहे. सर्व रस्त्यांची कामे एवढी निकृष्ट असूनही ही कामे एकाच कंत्राटदाराकडे देण्याची विशेष मेहरबानी कोणाच्या इशाऱ्यावर करण्यात आली हा प्रश्न उपस्थित होत आहे. या निकृष्ट कामांना वरिष्ठ अधिकाऱ्यांचे अभयदान का आहे? आणि लोकप्रतिनिधी या निकृष्ट कामांवर मूग गिळूण गप्प कसे बसले? असे अनेक प्रश्‍न निर्माण होत आहेत. याबाबत नागरिकांच्या मनामध्ये रोष असून लवकरच हा मुद्दा नवनियुक्त पालकमंत्री बच्चू कडू यांच्या निदर्शनास आणण्यात येईल असे परिसरातील नागरिकांनी सांगितले.

कामे व्यवस्थित करण्याचे आदेश देऊ
रस्त्यांची कामे निकृष्ट असतील तर ‘त्या’ कंत्राटदाराला कामे व्यवस्थित करायला सांगू.
-डी. के. इंगळे, कार्यकारी अभियंता, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com