मुख्यमंत्र्यांना भावली उईके यांची कार्यशैली

अशोक उईके
अशोक उईके

यवतमाळ : गटातटाच्या राजकारणात न अडकता सर्वांना सोबत घेऊन चालणे, पक्षसंघटन मजबूत करणे व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी असलेली जवळीक, काम करण्याची पद्धत मुख्यमंत्र्यांना भावल्याने प्राचार्य डॉ. अशोक उईके यांची थेट कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी लागली.
जवळपास वर्ष दीड वर्षापासून राज्यमंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू होती. अनेकदा मुहूर्त ठरलेत. मात्र, विस्तार झाला नाही. ज्यावेळी विस्ताराची चर्चा झाली, त्यावेळी प्राचार्य डॉ. अशोक उईके यांचे नाव चर्चेत राहिले. यावेळी तर नाव आघाडीवर होते. त्याला कारणही तसेच आहे. गेल्या 2014मध्ये आमदार झाल्यानंतर उईके यांनी जिल्ह्यातील गटातटाच्या राजकारणात न पडता अलिप्त राहणे पसंत केले. मतदारसंघाबाहेर न डोकावता आपल्या मतदारसंघात पक्षसंघटन मजबूत करण्यावर त्यांनी भर दिला. त्यांचा परिणाम राळेगाव व कळंब नगरपंचायतींच्या निवडणुकीत दिसून आला. गेल्या 2014 व 2019 या दोन्ही लोकसभा निवडणुकीत युतीच्या उमेदवारांचे मताधिक्‍य मोठे होते. यासोबतच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी असलेली जवळीक, आदिवासी समाजाती उच्चशिक्षित चेहरा याही उईके यांच्या जमेच्या बाजू ठरल्यात. यापेक्षाही विधिमंडळाच्या अनुसूचित जमाती कल्याण समितीचे अध्यक्षपदाची जबाबदारी दिल्यानंतर त्यांनी केलेल्या कामांची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली. साडेचार वर्षांत उईके यांची काम करण्याची पद्धत व सर्वांना सोबत घेण्याची कसब आदी बाबी मुख्यमंत्र्यांना भावल्यांने त्यांना थेट कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले.
मुख्यमंत्र्यांनी केला फोन
मंत्रिमंडळ विस्तारात वर्णी लागल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार अशोक उईके यांना दिली. रात्री दहा वाजता "वर्षा' या बंगल्यावर भेटीचे निमत्रंण दिले. मात्र, मुख्यमंत्री उशिरा आल्याने ही भेट मध्यरात्री झाली. "कॅबिनेट मंत्री म्हणून उद्या शपथ घ्या', असा संदेश मुख्यमंत्र्यांनी दिला.
आमदार अशोक उईके यांचा परिचय
प्राचार्य उईके यांचा जन्म एक जानेवारी 1964 रोजी झाला. यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव विधानसभा मतदारसंघातून 2014मध्ये प्रथमच भाजपचे आमदार झालेत. त्यांचे शिक्षण एम. एस्सी. पीएचडीपर्यंत झाले आहे. नगरसेवक ते आमदार आणि मंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे. प्रथम ते बुलडाणा नगरपालिकेत 1998मध्ये नगरसेवक होते. सध्या ते अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथे शिवाजी शिक्षण संस्थेच्या विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्यसुद्धा आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com