मुख्यमंत्री साहेब, नुकसानभरपाई द्याच; आमदार अग्रवालांचे साकडे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 3 नोव्हेंबर 2019

दुसरीकडे आमदार विनोद अग्रवाल यांनी गोंदिया विधानसभा क्षेत्रात पीक नुकसान पाहणीचा दौरा कार्यक्रम आखून थेट शेतकऱ्यांच्या बांध्यावर पोहोचले. शेतकऱ्यांशी संवाद साधत पीक नुकसानाची प्रत्यक्ष पाहणी केली. या वेळी परतीच्या पावसाने पीक नुकसान झालेला कोणताही शेतकरी मदतीपासून किंबहुना सर्वेक्षणापासून वंचित राहू नये, या बाबीची दखल घ्यावी, असे निर्देशही त्यांनी यंत्रणेच्या अधिकाऱ्यांना दिले.

गोंदिया : हंगामाच्या ऐन शेवटच्या टप्प्यात शेतमाल घरी आणण्याच्या वेळी परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना प्रचंड अडचणीत आणले. मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले. याची दखल घेत आमदार विनोद अग्रवाल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन शेतकऱ्यांची व्यथा मांडली. यानंतर राज्य सरकारने पिकांच्या नुकसानीच्या सर्वेक्षणाचे निर्देश संबंधित विभागांना दिले. कोणताही पीडित शेतकरी सर्वेक्षण व मदतीपासून वंचित राहू नये याची दखल घ्यावी, असे निर्देशही त्यांनी यंत्रणेला दिले आहेत. 

जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. तोंडाजवळ आलेला घास हिसकावल्यासारखी परिस्थिती निर्माण झाल्याने जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. या सर्व बाबीची व्यथा आमदार विनोद अग्रवाल यांनी मुख्यमंत्र्यांकडे मांडली. दरम्यान, त्वरित नुकसानाचे सर्वेक्षण करून मोबदला देण्यात यावा, अशीही मागणी त्यांनी लावून धरली. या मागणीची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यंत्रणेला पीक नुकसानाचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले. 

दुसरीकडे आमदार विनोद अग्रवाल यांनी गोंदिया विधानसभा क्षेत्रात पीक नुकसान पाहणीचा दौरा कार्यक्रम आखून थेट शेतकऱ्यांच्या बांध्यावर पोहोचले. शेतकऱ्यांशी संवाद साधत पीक नुकसानाची प्रत्यक्ष पाहणी केली. या वेळी परतीच्या पावसाने पीक नुकसान झालेला कोणताही शेतकरी मदतीपासून किंबहुना सर्वेक्षणापासून वंचित राहू नये, या बाबीची दखल घ्यावी, असे निर्देशही त्यांनी यंत्रणेच्या अधिकाऱ्यांना दिले. यावेळी त्यांच्यासोबत तहसीलदार भांडारकर, तालुका कृषी अधिकारी तुमडाम, कृषी अधिकारी (पंचायत समिती) रहांगडाले, जिल्हा कृषी अधिकारी शुक्‍ला, महसूल अधिकारी तिवारी यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. 

भिवखिडकीतील नुकसानग्रस्त धानाची पाहणी 
नवेगावबांध  : अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या धानपिकाची जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे व आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी पाहणी केली. भिवखिडकी येथील ईश्‍वर मडावी यांच्या शेतात जाऊन त्यांनी पाहणी केली. या वेळी त्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करून उपस्थित कृषी विभाग व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना मदतीच्या दृष्टीने आवश्‍यक त्या सूचना दिल्या.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chief Minister, pay compensation : MLA Agarwal