मुख्यमंत्र्यांचा दौरा ऐनवेळी रद्द 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

यवतमाळ - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येथे गुरुवारी (ता. 12) यवतमाळ अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यासाठी येणार होते. त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी झाली असतानाच ऐनवेळी त्यांचा दौरा रद्द झाल्याचा शासकीय संदेश आल्याने विविध चर्चेला उधाण आले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहू न शकल्याबाबत दिलेले कारण मोठे असले, तरी त्यांचा दौरा हा शेतकरी आत्महत्या व शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांना द्यायला सरकारजवळ उत्तर नसल्याने रद्द झाल्याची चर्चा जिल्ह्यात होत आहे. 

यवतमाळ अर्बन बॅंकेच्या नवीन इमारतीचा लोकार्पण सोहळ्याचे अध्यक्षस्थान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भूषविणार होते. या कार्यक्रमासाठी मोठा पोलिस बंदोबस्तही लावला होता. परंतु, ऐनवेळी मुख्यमंत्री येणार नसल्याचे प्रशासनाने जाहीर केले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी केवळ शुभेच्छा संदेश पाठविला. सोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकशाही वाचविण्यासाठी देशभर आयोजित केलेल्या सामूहिक उपवास आंदोलनाच्या कार्यक्रमात आपण मुंबईत सहभागी होणार असल्याने लोकार्पण सोहळ्याला उपस्थितीत राहू शकत नाही, याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. परंतु, नंतर मुख्यमंत्री जिल्ह्यातील शेवटचे टोक असलेल्या उमरखेड येथे मात्र दौऱ्यावर पोचले. 

मुख्यमंत्री यवतमाळात आले नाही; मात्र उमरखेड व नांदेड येथे गेल्याचे समजल्यावर, मुख्यमंत्री फडणवीस यांच्याजवळ शेतकऱ्यांच्या विविध प्रश्‍नांना देण्यासाठी त्यांच्याकडे उत्तरे नसल्याने त्यांनी यवतमाळ रद्द केल्याचा आरोप विविध शेतकरी संघटनांनी केला. घाटंजी तालुक्‍यातील राजूरवाडी येथील शेतकरी शंकर भाऊराव चायरे (वय 50) याने मंगळवारी (ता. 10) रोजी केलेल्या आत्महत्येमुळे व पंतप्रधान आणि मुख्यमंत्री येणार नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका नातलगांनी घेतल्यामुळे यवतमाळ जिल्ह्यात संतापाची भावना आहे. चायरे यांचा मृतदेह शहरातील शवविच्छेदन गृहात असताना मुख्यमंत्री एका बॅंकेच्या इमारतीचे उद्‌घाटन करीत असल्याचा वाईट संदेश राज्यभर पसरला असता, म्हणून मुख्यमंत्र्यांनी ऐनवेळी काही तरी कारण दाखवून आपला दौरा रद्द केला असावा, अशी चर्चा जोरात सुरू आहे. 

Web Title: Chief Minister Yavatmal visit canceled