शुल्क वसुलीच्या विळख्यात चिमुकला कॅन्सरग्रस्त

केवल जीवनतारे
गुरुवार, 28 जून 2018

नागपूर - वय अवघे आठ वर्षांचे. कॅन्सरशी मैत्री झाल्याने नशिबी किती दिवस जगणे आहे, हे ठावूक नाही. मात्र आहेत ते दिवस जगवण्यासाठी वडिलांचा संघर्ष सुरू आहे. घरी अठराविश्‍वे दारिद्य्र आहे. परंतु लेकाला मोफत उपचार मिळतील या आशेवर नांदेडवरून मेडिकलमध्ये खेटा घालतो.

नागपूर - वय अवघे आठ वर्षांचे. कॅन्सरशी मैत्री झाल्याने नशिबी किती दिवस जगणे आहे, हे ठावूक नाही. मात्र आहेत ते दिवस जगवण्यासाठी वडिलांचा संघर्ष सुरू आहे. घरी अठराविश्‍वे दारिद्य्र आहे. परंतु लेकाला मोफत उपचार मिळतील या आशेवर नांदेडवरून मेडिकलमध्ये खेटा घालतो.

चिमुकल्याच्या कार्डावर महात्मा फुले जनआरोग्याचा स्टॅम्प असूनही शुल्क भरल्याशिवाय चाचणी होणार नाही, असे कर्मचाऱ्याने सांगितले. पैसे नसल्याने चाचणी होणार नसल्याने वडिलांच्या डोळ्यात पाणी आले. हे एका गरिबांच्या डॉक्‍टरला बघवले नाही, त्या डॉक्‍टरचे डोळे डबडबले. निवृत्त झालेल्या त्या डॉक्‍टरने खिशातून साडेतीनशे रुपये त्या चिमुकल्याच्या वडिलांच्या हातावर ठेवले. चाचणी झाली. आता पुढील औषधोपचार कसा? हा सवाल मात्र अनुत्तरित आहेच.

चिमुकल्या कॅन्सरग्रस्ताचे नावदेखील कळले नाही. मात्र आयुष्यभर कॅन्सरग्रस्तांवर उपचार करणाऱ्या डॉक्‍टरचे नाव डॉ. कृष्णा कांबळे असे आहे. बुधवारी साडेतीनशे रुपये भरल्यानंतर त्या चिमुकल्याची चाचणी झाली. यावरून शासनाकडून मोफत उपचाराचा देखावाच केला जातो, हे पुन्हा एकवार सिद्ध झाले. डॉ. कांबळेंनी मेडिकलच्या कॅन्सर विभागात ३५ वर्षे सेवा दिली. निवृत्तीनंतरही त्यांची सेवा कॅन्सरग्रस्तांना मिळत आहे.

भामरागडपासून तर मेळघाटातील गरीब कॅन्सरग्रस्तांसाठी ते देवदूतच आहेत. दिवाळीला आकाशकंदील म्हणजे काय हेच मुलांना ठाऊक नसते, मात्र अशा मुलांच्या आयुष्यात चार क्षण आनंदाचे उपलब्ध करून देण्यासाठी दिवाळीला नवीन कपडे भेट देण्याचा कार्यक्रम ते राबवतात. गरीब कॅन्सरग्रस्तांसाठी दानशूरांना मदतीचे आवाहन करतात. मात्र बुधवारी नांदेडहून आलेल्या मुलाला चक्क प्रशासनाने झिडकारल्यानंतर कांबळेंचे हृदय हेलावले. हे दृश्‍य बघवले नाही, निवृत्त असल्याने कांबळे त्या कर्मचाऱ्याला काहीच बोलू शकले नाही.

वडिलांनी हात जोडले
केवळ रक्ताचा कॅन्सर असलेल्यांना शुल्क माफ आहे. उर्वरित साऱ्याच कॅन्सरग्रस्तांकडून शुल्क वसूल केले जाते. शुक्रवारपासून कायदा बदलला असे सांगून एचएमआयसच्या मुलाने शुल्क भरल्याशिवाय चाचणी नाही, अशी भूमिका घेतली. विनणवी केली परंतु येथे माणुसकी हरवली. अखेर डॉक्‍टरने पैसे दिल्यानंतर वडिलांनी दोन्ही हात जोडले.  

गरीब कॅन्सरग्रस्तांच्या डोळ्यातील अश्रू आयुष्यभर पाहत आलो आहे. पूर्वी मोफत उपचार होत होते. आता मात्र हा गोड गैरसमज झाला आहे. लेकराच्या उपचारासाठी गरीब बाप नांदेडवरून मेडिकलमध्ये येतो. पैसे नसल्याने बाप हतबल असतो, हे दृश्‍यच बघवत नाही. मेडिकलमध्ये येणारे सारेच गरीब आहेत. शुल्काअभावी उपचारापासून वंचित ठेवण्याचा प्रकार घृणास्पद आहे. मोफत उपचाराचा खोटा देखावा शासनाकडून उभा केला जात आहे.
- डॉ. कृष्णा कांबळे, ज्येष्ठ कॅन्सररोगतज्ज्ञ

Web Title: child cancer affected treatment Dr. krishna kamble