पती-पत्नीतील ताटातुटीतून उमलतात बालगुन्हेगारीचे बीजं

भगवान वानखेडे 
गुरुवार, 16 जानेवारी 2020

अल्पवयीन करतायेत मोठे गुन्हे करत असल्याने पालकांसह पोलिसही अवाक होत असल्याचे चित्र अकोल्यात दिसून येत आहे.
 

अकोला ः कळत-नकळत लहान मुले पालकांकडून खूप काही शिकत असतात. बरे-वाईटाचे बाळकडू आधी कुटुंबातच मिळत असल्याने घरात कधी आणि कसे वागावे याची जबाबदारी पालकांवरच असते. मात्र, याच दरम्यान वाद विकोपाला जाऊन विभक्तही होतात. याचा परिणाम त्या जोडप्यावरही होतो मात्र, प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या त्यांच्या पाल्यावरही होतो. अशातच खदान आणि रामदासपेठ पोलिस ठाण्यांतर्गत घडलेल्या दोन घटनांमधून पत्नी-पत्नीमधील वाद बालगुन्हेगारीचे बीजं रोवत असल्याचे दिसून येत आहे.

2019 या वर्षातील डिसेंबरमध्ये खदान पोलिस ठाण्यांतर्गंत येणाऱ्या एका 13 वर्षीय चिमुकलीस तब्बू आणि तिच्या सहकाऱ्यांनी बाहेर राज्यात विकल्याची घटना घडली होती. याप्रकरणी पोलिसांना ती चिमुकली शोधून आणण्यात यश आले खरे. मात्र, याप्रकरणातील विकलेल्या चिमुकलीच्या कुटुंबाचा आढावा घेतला असता तिची आई आणि वडील विभक्त झाले असून, उदरनिर्वाहासाठी पीडितेची आई हातमजुरी करते. यातच मुलीकडे दुर्लक्ष झाल्याने मुलगी नशेच्या आहारी गेल्याचीही माहिती समोर आली होती. तर दुसरी घटना यापेक्षाही विचार करायला लावणारी असून, अगदी 17 वर्षीय मुलीसोबत साडेसोळा वर्षीय मुलाचे प्रेमसंबंध प्रस्थापीत झाले आणि त्यातून मुलगी दोन महिने पाच दिवसांची गर्भवती राहली. यासुद्धा प्रकरणात मुलीचे आई-वडील काही वर्षापूर्वीच विभक्त झाले असून, वडील अकोल्यात तर आईने नागपुरात दुसरे लग्न केले आहे. तेव्हा स्वतःच नैराश्‍याच्या छायेत असलेले हे पालक आपल्या मुला-मुलींचे भवितव्य अंधारात ढकलत असल्याचे दिसून येत आहेत.

जबाबदारी कोणाची?
विधी संघर्ष बालके पळून जाणे, नशा करणे, चोरी, यासारखे गुन्हे करीत आहेत. ही गुन्हे उघडकीस आल्यानंतर पालकांसह पोलिसही अवाक होतात. मात्र, या पाल्यांनी असे काहीच करू नये याची जबाबदारी कोणाची असा प्रश्‍न मात्र, अनुत्तरीतच राहतो. विशेष म्हणजे झोपडपट्टी परिसरात वास्तव्य करून नशेखोर पालक पाल्यांकडे कितीपत लक्ष देतात हा संशोधणाचा विषय आहे.

Image may contain: one or more people

अकोल्यात उघडकीस येतात लागोपाठ घटना
खदान, जुने शहर, रामदासपेठ अकोटफैल या पोलिस ठाण्यांत मागील काही दिवसांपासून चोरी, प्राणघातक हल्ला, पळून जाणे आणि फूस लावून पळून नेण्याच्या गुन्ह्यात बहुतांश अल्पवयीन मुलेच असल्याचे समोर आले आहे. ही बाब अकोलेकरांसाठी चिंतन करण्याबरोबरच चिंतेची आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Child crime seeds sprout from famely conflict