पावसाच्या तडाख्यातून वाचविलेल्या कापसाच्या गंजीने मुलाचा जीव

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 नोव्हेंबर 2019

- सातव्या वर्गात शिकत होता तुषार
- मोताळा तालुक्यातील अंत्री येथील जवरे कुटुंबियावर शोककळा
- परिसरात हळहळ व्यक्त

मोताळा (जि.बुलडाणा) : कापसाच्या ढिगाऱ्यात दबून 13 वर्षीय विद्यार्थ्याचा करुण अंत झाल्याची घटना अंत्री येथे मंगळवारी (ता.19) सकाळी 10 वाजताच्या सुमारास घडली. तुषार चंद्रकांत जवरे असे त्या मुलाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

मोताळा तालुक्यातील अंत्री येथील शेतकरी चंद्रकांत रविदास जवरे यांनी घरात कापसाची गंजी रचून ठेवली होती. दरम्यान, मंगळवारी (ता.19) सकाळी 10 वाजताच्या सुमारास त्यांचा मुलगा तुषार हा कापूस मोकळा करीत असताना, अचानक कापसाच्या ढिगाऱ्यात दबून श्वास गुदमरल्याने त्याचा करुण अंत झाला. ही बाब कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांनी तुषारला तातडीने कापसाच्या ढिगाऱ्यातून काढून उपचारासाठी रुग्णालयात हलविले. परंतु, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. तुषार जवरे हा मोताळा येथील स्व. बबनराव देशपांडे विद्यालयात सातव्या वर्गात शिकत होता. घटनेच्या दिवशी त्याच्या आईने त्याला आंघोळीसाठी पाणी टाकले व घरासमोर धुणीभांडी करीत होती. यावेळी तुषार हा एकटा घरात होता. चिमुकल्या तुषारचा करुण अंत झाल्याने त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. यावेळी कुटुंबीयांचा आक्रोश हृदय हेलावून टाकणारा होता. तुषारच्या पार्थिवावर मंगळवारी सायंकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई, वडील, एक लहान भाऊ व बराच मोठा आप्त परिवार आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: child dies in cotton