बुलडाण्यातील अल्पवयीन मुलीचा बालविवाह वर्ध्यात रोखला...अखेर पोलिसांनी केली कारवाई

रूपेश खैरी
Tuesday, 8 September 2020

चाइल्ड लाइन बुलडाणा व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी बुलडाणा यांच्या मदतीने बालिकेचा शोध घेण्यात आला. ही बालिका वर्धा जिल्ह्यात नातेवाइकांकडे विवाहासाठी गेल्याचे कळले. जिल्हा बाल संरक्षण कक्ष बुलडाणा यांच्याकडून या बालविवाहाची माहिती महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाअंतर्गत जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांना देण्यात आली.

वर्धा : बालविवाह कायद्याची भीती न बाळगता बुलडाणा येथून वर्ध्यात येत अल्पवयीन मुलीचा विवाह करण्याचा प्रयत्न येथील बालसंरक्षण कक्ष व पोलिस विभागाने संयुक्‍त कारवाई करीत हाणून पाडला. या बालिकेच्या पालकांना बालकल्याण समितीसमोर उभे केले. त्यांनंतर बालिकेच्या पालकांना तिची काळजी घेण्याची समज देण्यात आली.

बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्‍यातील एकलारा गावातील एका १५ वर्षीय बालिकेचा विवाह वर्धा येथील युवकाशी होणार असल्याची माहिती तेथील चाइल्डलाइनला मिळाली होती.

बालविवाहासाठी वर्ध्यात केले पलायन

त्यांनी या कुटुंबाची भेट घेत बाल संरक्षण कक्ष बुलडाणा यांच्या मार्गदर्शनाखाली ग्राम बाल संरक्षण समिती काटेल अध्यक्ष, सचिव आणि पोलिस पाटील यांनी बालिकेच्या माता-पित्यांना बालविवाह प्रतिबंध अधिनियम २००६ अंतर्गत बालविवाह गुन्हा असल्याचे कळविले होते. तशी समज बालिकेच्या घरच्यांना देण्यात आली होती. असे असताना कायद्याचा धाक न बाळगता संबंधितांनी हा विवाह घडून आणण्यासाठी वर्धा येथे पलायन केले.

जिल्हा बाल संरक्षण कक्ष बुलडाणाकडून माहिती

त्यानंतर चाइल्ड लाइन बुलडाणा व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी बुलडाणा यांच्या मदतीने बालिकेचा शोध घेण्यात आला. ही बालिका वर्धा जिल्ह्यात नातेवाइकांकडे विवाहासाठी गेल्याचे कळले. जिल्हा बाल संरक्षण कक्ष बुलडाणा यांच्याकडून या बालविवाहाची माहिती महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाअंतर्गत जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांना देण्यात आली.

अवश्य वाचा : पितृपक्ष : ना गाय, ना श्वान श्राद्ध केले की कावळ्यालाच देतात नैवेद्य.. पण का? जाणून घ्या शास्त्रीय कारण

मुलीसह पालकांना घेतले ताब्यात

जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या आदेशानुसार या माहितीवर रामनगर पोलिस स्टेशन येथील धनाजी जळक व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी व कक्षाचे कर्मचारी यांनी बालिकेला संबंधितांसमवेत ताब्यात घेऊन बाल कल्याण समिती वर्धा यांच्या समोर हजर केले.

(संपादन : दुलिराम रहांगडाले)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Child marriage of a minor girl from Buldana stopped in Wardha