गुणांपेक्षा अपेक्षांचीच टक्केवारी अधिक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 जून 2018

नागपूर - मुलांची क्षमता, त्यांच्या गुणांची टक्केवारी, त्यांची स्वतःची आवड-निवड आदींचा विचार न करता बहुतांशी पालक अपेक्षांचा डोंगर रचू लागले आहेत. ज्योतिषी आणि समुपदेशकांकडे गर्दी करणारे नव्वद टक्के पालक, ‘आमच्या मुलांना गलेलठ्ठ पॅकेजची नोकरी मिळेल का सांगा?’ हा एकच सवाल करीत आहेत. 

नागपूर - मुलांची क्षमता, त्यांच्या गुणांची टक्केवारी, त्यांची स्वतःची आवड-निवड आदींचा विचार न करता बहुतांशी पालक अपेक्षांचा डोंगर रचू लागले आहेत. ज्योतिषी आणि समुपदेशकांकडे गर्दी करणारे नव्वद टक्के पालक, ‘आमच्या मुलांना गलेलठ्ठ पॅकेजची नोकरी मिळेल का सांगा?’ हा एकच सवाल करीत आहेत. 

सालाबादाप्रमाणे यंदाही चिंताग्रस्त पालक ज्योतिषी आणि समुपदेशकांकडे गर्दी करीत आहेत. विशेष म्हणजे निकाल लागण्याच्या आठ दिवस आधीपासूनच करिअरची दिशा ठरविण्यासाठी ही गर्दी झाली. मुलांना किती गुण मिळणार, याचा अंदाज बांधून समीकरण जोडले जात आहे. यामध्ये विशेषत्वाने मुलांची इच्छा किंवा क्षमता यांना दुय्यम स्थान देणारे बहुतांशी पालक आहेत.

इंजिनिअरिंगमध्ये प्रवेशाचा टक्का गेल्या काही वर्षांमध्ये कमी झाला असला तरीही ‘स्टेटस’साठी का होईना, मुले इंजिनिअरच झाली पाहिजे, असाही काही पालकांचा अट्टहास आहे. त्याचसोबत ज्या मुलांना साठ टक्केही मिळतील की नाही, याची शाश्‍वती नाही, अशांच्याही पालकांची पैसे खर्चून डॉक्‍टर-इंजिनिअर करण्याची तयारी आहे. काही प्रमाणात आपल्या क्षमतांचा विचार करण्यापेक्षा मित्रांमध्ये असलेला ट्रेंड फॉलो करण्यासाठी मुलेही हट्ट करीत आहेत. स्पर्धेत उतरण्यापेक्षा स्वतःचा वेगळा मार्ग निवडण्याची इच्छा असलेल्या मुलांनीही सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करावे, असेही पालकांना वाटत आहे. या एकूणच अपेक्षांच्या गोंधळात गुणांपेक्षा अपेक्षांचीच टक्केवारी अधिक असल्याचे ज्योतिषांचे व समुपदेशकांचे म्हणणे आहे. 

मुलांच्या क्षमतेला बहुतांशी पालक दुय्यम स्थान देतात. त्यांचे करिअर कशात आहे, त्यांचा कल जाणून घेण्यापूर्वीच अनेक पालकांनी दिशा ठरविलेली असते. सरकारी नोकरी, मोठा अधिकारी, गलेलठ्ठ पगार या अतिशय अवघड बाबी पालकांच्या प्राधान्यक्रमात असतात.
- डॉ. अनिल वैद्य, आंतरराष्ट्रीय ज्योतिष्याचार्य

पालकांच्या अपेक्षांमुळे जास्त गोंधळ उडतो. क्‍लासेसचे मार्केटिंग करणारे पालकांच्या अपेक्षा वाढवतात. या गोंधळात नैराश्‍य येऊन मुले भरकटतात आणि त्यातूनच आत्महत्यांचे प्रयत्न होतात. वास्तवात येऊन आवडी-निवडी आणि क्षमता तपासल्या पाहिजे.  
- डॉ. राजा आकाश, करिअर कन्सल्टंट सायकॉलॉजिस्ट

Web Title: Child Parent Carrier job future