‘हॅंडलर्स’च्या ताब्यातून ३१ मुलांची सुटका

Crime
Crime

नागपूर - आकर्षक मिळकतीचे आमिष दाखवून धोकादायक उद्योगांमध्ये जुंपण्यासाठी नेल्या जात असलेल्या ३१ अल्पवयीन मुलांची हॅंडलर्सच्या ताब्यातून सुरक्षित सुटका करण्यात आली. नागपूर स्थानकावरून २६ तर बल्लारशाह स्थानकाहून ५ मुलांना ताब्यात घेण्यात आले. चाइल्ड लाइन, आरपीएफ, रेल्वे प्रशासनाने मंगळवारी संयुक्तरित्या हे रेस्क्‍यू ऑपरेशन केले. 

ताब्यातील बहुतांश मुले बिहारच्या दानापूर, बनिया, खगरिया येथील आहेत. तीन ते चार वेगवेगळ्या टोळ्यांकडून या मुलांना धोकादायक उद्योगांमध्ये कामाला लावण्यासाठी नेले जात होते. सोमवारी रात्रीच याबाबत नागपूर चाइल्ड लाइनला टिप मिळाली होती. त्यानुसार विभागीय रेल्वे व्यवस्थापक, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, रेल्वे सुरक्षा दल आणि लोहमार्ग पोलिसांना सूचना देण्यात आली. यानंतर सापळा रचून कारवाईचा निर्णय घेण्यात आला. देखरेखीसाठी नरखेड स्थानकाहून साध्या वेशातील जवानांना चढविण्यात आले. दुपारी ३ वाजताच्या सुमारास दाणापूर - सिकंदराबाद एक्‍स्प्रेस फलाट क्रमांक २ वर दाखल होताच दबा धरून बसलेल्या जवानांसह चाइल्ड लाइनच्या कार्यकर्त्यांनी एस-८, ९,१० आणि जनरल डब्यातून २६ मुलांना खाली उतरवून घेतले. यापैकी १२ मुले बडनेऱ्याला सिमेंट कारखान्यात, काही नागपुरात व सिकंदराबादला कामासाठी तर काही स्टील उद्योगात कामासाठी नेले जात असल्याचे पुढे आले. या कारवाईसाठी सुमारे २५ मिनिटे ही गाडी फलाटावरच थांबवून ठेवण्यात आली. मुलांची संख्या अधिक असल्याची सूचना असल्याने काही जवानांना आतच ठेवण्यात आले.

बल्लारशाह स्थानकावर दिव्यांगांसाठी राखीव बोगीतून ९ मुलांना उतरविण्यात आले. त्यातील ५ मुले अल्पवयीन आहेत. रात्री या मुलांची शासकीय बाल निरीक्षण गृहात रवानगी करण्यात आली. बुधवारी त्यांना बालकल्याण समितीपुढे सादर केले जाणार आहे. 

या प्रकरणात आठ हॅंडलर्सना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्यासह हे प्रकरण पुढील तपासासाठी लोहमार्ग पोलिसांकडे सोपविण्यात आले आहे.

आधारकार्ड बोगस?
या मुलांकडे आधारकार्ड आहेत. बहुतेक कार्डवर १ जानेवारी ही समान जन्मतारीख असून वर्ष १९९९ ते २००१ दरम्यान आहे. यावरून सर्वच कार्ड बोगस असून मुलांना मोठे दाखविण्यासाठी ते तयार केले गेले असावेत, असा संशय आहे. 

मुलांना निकृष्ट जेवण
सुटका झालेली मुले उपाशी असल्याने त्यांच्यासाठी रेल्वेस्थानकावरून जेवण बोलाविण्यात आले. ते खराब झाल्याने मुलांनी एकही घास खाल्ला नाही. अखेर ते आणले तसे टाकून देण्यात आले. यानंतर मुलांसाठी नव्याने खाद्यपदार्थांची व्यवस्था करण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com