पंधरा टक्के मुलांना बाराव्या वर्षीच दृष्टिदोष

विवेक मेतकर
मंगळवार, 22 जानेवारी 2019

अकोला - मोबाईल, कॉम्प्युटरच्या अतिवापरामुळे मुलांना चष्मा लागण्याचे प्रमाण वाढले असून, बारा वर्षे वयापर्यंतच्या
जवळपास पंधरा टक्के मुलांना दृष्टिदोष असल्याचे नेत्रतज्ज्ञांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. बदलती जीवनशैली आणि स्क्रीन गॅजेट्‌सचा अतिवापर यामुळे वाढत्या वयाच्या मुलांची दृष्टी कमकुवत होत असल्याचेही ते सांगतात.

अकोला - मोबाईल, कॉम्प्युटरच्या अतिवापरामुळे मुलांना चष्मा लागण्याचे प्रमाण वाढले असून, बारा वर्षे वयापर्यंतच्या
जवळपास पंधरा टक्के मुलांना दृष्टिदोष असल्याचे नेत्रतज्ज्ञांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. बदलती जीवनशैली आणि स्क्रीन गॅजेट्‌सचा अतिवापर यामुळे वाढत्या वयाच्या मुलांची दृष्टी कमकुवत होत असल्याचेही ते सांगतात.

विशेषतः चार ते बारा वर्षे वयोगटातील मुलांमध्ये चष्मा लागण्याचे प्रमाण अधिक आहे. संपूर्ण देशाचा विचार करता या वयोगटातील एकूण संख्येमागे हे प्रमाण 14 ते 15 टक्के आहे. ग्रामीण भागांमध्ये हे प्रमाण पाच ते सहा टक्के असले तरी शहरी मुलांमध्ये तीस टक्‍क्‍यांनी अधिक आहे, असे नेत्ररोगतज्ज्ञांनी सांगितले.

शहरी भागातील मुले तासन्‌तास एकाच जागेवर बसून मोबाईल किंवा तत्सम स्क्रीन गॅजेट्‌सवर गेम खेळतात, एकसारखे टीव्ही पाहतात. पालकही त्यांना खेळण्यासाठी गॅजेट्‌स देतात. त्यामुळे मैदानी खेळांकडे मुलांचे दुर्लक्ष झाले आहे.

खुल्या वातावरणात दूरवर पाहण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. त्याचा परिणाम त्यांच्या दृष्टीवर होत आहे. मोबाईल, टीव्ही, संगणक यांच्या वाढत्या वापराने डोळ्यांचा आकार वाढतो. डोळ्यातील बाह्य आवरण कमी पडते, त्यामुळे डोळे कोरडे होतात. डोळ्यांचे स्नायू थकतात. त्यामुळे डोळ्यांवर ताण येऊन चष्मा लागतो. कधी कधी लहान मुले एका कुशीवर झोपून मोबाईल पाहतात, त्यामुळे एकाच डोळ्यावर जास्त ताण येऊन "लेझी आय' हा त्रास होतो.

मोबाईल वापरण्याच्या चुकीच्या पद्धती, मोबाईलचा ब्राइटनेस जास्त असणे, स्क्रीन छोटा असणे, फॉंट साइज कमी असणे यामुळेदेखील डोळ्यांवरील ताण वाढतो, असेही नेत्रतज्ज्ञांनी सांगितले.

अशी घ्या काळजी!
- मोबाईल, टीव्ही यांचा कमी वापर करा
- स्क्रीनकडे 45 मिनिटांपेक्षा जास्त वेळ पाहू नये
- रोज किमान वीस मिनिटे मैदानी खेळ खेळावेत
- दूध आणि फळे खाणे, त्यातून "अ' आणि "ई' जीवनसत्त्व मिळते


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Child Vision defects by Mobile Computer