घराला ना प्लास्टर ना छत, तरी होतंय अध्यापन; शिक्षणमित्राच्या मदतीने मुले करताहेत शिष्यवृत्ती

श्रीनाथ वानखडे
Thursday, 8 April 2021

गावातील प्रतीक्षा चेंडकापुरे व रत्नमाला खोब्रागडे यांनी या आवाहनाला होकार दिला. गत दीड वर्षापासून रत्नमाला ही विविध स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करीत आहे. तरीही स्वतःसोबत इयत्ता चौथी व पाचवीमधील मुलांचा अभ्यास ती घेत आहे.

मांजरखेड कसबा (जि. अमरावती) : अध्यापन म्हटले तर डोळ्यांसमोर येते ती शाळा व शिक्षक. पण कोरोनामुळे शाळाच सध्या लॉकडाउन झाल्या आहेत. याही भीषण काळात आपल्या गावातील मुलांचे शिक्षण थांबू नये म्हणून अमदुरी गावातील स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असलेल्या रत्नमाला खोब्रागडे हिने शिक्षणमित्र म्हणून पुढाकार घेतला आहे. एकीकडे तिच्या निर्माणाधीन घराच्या भिंतींना ना प्लास्टर (छपाई) आहे, ना त्या घरावर छत आहे. तरीही तिच्या सहकार्यामुळे बालगोपालांचा अभ्यासासोबत नवोदय व शिष्यवृती परीक्षेचा अभ्यास निरंतर सुरू आहे.
 
चांदूररेल्वेपासून जेमतेम आठ किलोमीटरवर हजार लोकसंख्या असलेले अमदुरी हे गाव. येथील जिल्हापरिषद शाळेत ४१ विद्यार्थी असून गत वर्षभरापासून शाळा कोरोनामुळे बंदच आहे. गावातील विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शेख अहमद व मुख्याध्यापक विकास काळमेघ यांनी गावातील उच्चशिक्षित होतकरू मुलांना शाळेतील विद्यार्थ्यांचा अभ्यास घेण्यासाठी आवाहन केले.

जाणून घ्या - पालकमंत्री बच्चू कडू यांनी लगावली स्वयंपाकीच्या कानशिलात

गावातील प्रतीक्षा चेंडकापुरे व रत्नमाला खोब्रागडे यांनी या आवाहनाला होकार दिला. गत दीड वर्षापासून रत्नमाला ही विविध स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करीत आहे. तरीही स्वतःसोबत इयत्ता चौथी व पाचवीमधील मुलांचा अभ्यास ती घेत आहे. तिचे शिकवणे मुलांना आवडत असल्यामुळे मुलेही नियमितपणे बिन छताच्या वर्गात रममाण होतात. 

शिक्षणमित्रच बनले शिक्षक

मार्च २०२० पासून कोरोनाच्या प्रसारामुळे शाळा अध्यापनाकरिता बंद आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शिक्षक स्वतःच्या वेतनातून दरमहा हजार ते तीन हजारांपर्यंत होतकरू शिक्षणमित्रांना अर्थसाहाय्य करीत आहेत. कोरोना कालावधीत शिक्षणमित्रच शिक्षकांची भूमिका निभावत आहेत. यानिमित्ताने अल्प कालावधीसाठी का होईना, अनेक युवक-युवतींचे शिक्षक होण्याचे स्वप्न पूर्ण होत आहे.

अधिक माहितीसाठी - हिट एक्झॉशन, हिट स्ट्रोक स्वतःला कसे वाचवाल? जाणून घ्या उष्माघाताची कारणे, लक्षणे आणि उपचार

स्वाध्यायात आघाडी

कोरोनामुळे शिक्षक व विद्यार्थी यांच्यात प्रत्यक्ष संपर्क नसल्यामुळे शिक्षणमित्र हेच शाळा व विद्यार्थी यांदरम्यान सेतू म्हणून कार्य करीत आहेत. ग्रामीण भागातील पालकांजवळ ऍण्ड्रॉइड मोबाईल नसल्यामुळे बहुसंख्य विद्यार्थी शिक्षणमित्राच्या मोबाईलवर व्हॉट्‌सऍप बेस स्वाध्याय सोडवत आहेत. शिक्षक व शिक्षणमित्रांमुळेच स्वाध्यायमध्ये जिल्हा आघाडी घेत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The children are doing scholarships with the help of Shikshanmitra Amravati news