बालक दिनाचे काय पुसता...भुकेचे काय ते बोला?

केवल जीवनतारे
बुधवार, 14 नोव्हेंबर 2018

बालक दिनाचे काय पुसता...भुकेचे काय ते बोला?

बालक दिनाचे काय पुसता...भुकेचे काय ते बोला?
नागपूर : "घर से मस्जिद है बहुत दूर...चलो यूँ कर लें, किसी रोते हुये बच्चे को हंसाया जाये...' या उर्दू कवी निदा फाजली यांच्या कवितेच्या ओळी बालकदिनाच्या तत्त्वज्ञानाला तंतोतंत लागू पडतात. परंतु ज्याला ना माय...ना बाप...त्याच्या साथीला आहे मोकळे आकाश...असा रस्त्यावरचे आयुष्य जगणाऱ्या चिमुकला.."राजा'...याच्या जगण्याची सोय नाही. परंतु तहान-भुकेने व्याकूळ झालेल्या "चाचा नदीम' यांची तहान भागवण्याचे त्याचे पुण्यकर्म नजरेत भरते. बालकदिन म्हणजे काय, हे त्याला ठाऊक नाही, म्हणूनच "बालक दिनालाही तो पोटातील भुकेचं काय ते बोला...?' असा हृदयात रक्ताच्या चिरकांड्या उडवणारा सवाल विचारतो, तेव्हा मन सुन्न होते....
बालकदिनाच्या पूर्वसंध्येला पूर्व नागपुरातील रस्त्याच्या कडेला घडलेला प्रसंग. नाव राजा, परंतु कफल्लक, भीक मागून जमवलेली काही चिल्लर खिशात. मुक्काम पोस्ट कधी फुटपाथ तर कधी प्लॅटफॉर्म. हिवाळा, पावसाळ्यात रात्रीचा निवारा पुलाखाली तर उन्हाळ्यात मोकळ्या आकाशाखाली. यालाही भाव-भावना आहेत, जगण्याची उंच उडण्याची इच्छा त्याचीही आहे. परंतु आई-बाप कोण? हेच या राजाला ठाऊक नाही. कोठून आला हेदेखील त्याला माहीत नाही. संस्कार देणारे हात नाही, बळ देणारं कोणी नाही, तरीही व्यसन त्याला शिवले नाही. असे कोमेजलेले बालपण घेऊन तो जगत आहे. उपराजधानीत एक नव्हे तर हजारो चिमुकली यशवंत स्टेडियमसमोरच्या फुटपाथवर, अजनी पुलाजवळ, व्हीआयपी रोडवर तर पूर्व नागपुरात इतवारी रेल्वेस्थानकाच्या परिसरात कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर तर पुलाखाली दिसतात. भीक मागणे, कचरा गोळा करत जगणे, हाच त्यांचा उद्योग. आयुष्य भटकलेल्या मुलांच्या पुनर्वसनाचे कार्यक्रम राज्यात आखण्यात येतात. बाल हक्कांबद्दल सारेच जागरूक आहेत. बालमजुरीविरुद्ध लढाही तीव्रतेने लढला जातो. तरी मुलांची संख्या मात्र जैसे थे आहे.
बालपण हरवलेली देवाघरची फुले
मुले ही देवाघरची फुले आहेत, असे मानतो. परंतु बालपण हरवलेली अनाथ मुले प्लॅटफॉर्मवर विड्या ओढताना किंवा बुटपॉलिश करून पैसा मिळवतात. दोन वेळच्या जेवणाची सोय करतात. पुढे हीच मुले गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळतात. शासनाच्या योजनांतून या मुलांचे जगणे सुकर करावे. नियतीशी दोन हात करण्याचे बळ त्यांच्यात निर्माण करण्यासाठी योजनांचे लाभ द्यावा. जगण्याचे व्यावहारिक शिक्षण आणि शिक्षण धर्म निभवावा. परंतु सारेच दिवास्वप्न आहे.

बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2000 राज्यात राबवला जातो. उन्मार्गी, अवखळ, भटकी, वाम मार्गाला लागलेल्या मुलांचे संगोपन, शिक्षण, संरक्षण व भावी आयुष्यात जबाबदार नागरिक बनवण्याचे उद्देश यात आहेत. परंतु रस्त्यावरचे आयुष्य जगणाऱ्या मुलांना याचा लाभ होत नाही. रस्त्यावरचे आयुष्य जगणारी आजही रस्त्यावरच भीक मागताना दिसतात.
-विलास भोंगाडे, सामाजिक कार्यकर्ते, नागपूर.

Web Title: Children day news