मिरचीचे भाव घसरले

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 मार्च 2017

नागपूर - पावसाने चांगली हजेरी लावल्याने यावर्षी मिरचीच्या उत्पादनात विक्रमी वाढ झाली. त्यामुळे कळमना बाजारात आवक वाढल्याने लाल मिरचीच्या भावात ३० ते ४० टक्के घसरण झाली आहे. गेल्यावर्षी १२० रुपये प्रतिकिलो असलेली मिरची ८० रुपये प्रतिकिलोवर आली. 

नागपूर - पावसाने चांगली हजेरी लावल्याने यावर्षी मिरचीच्या उत्पादनात विक्रमी वाढ झाली. त्यामुळे कळमना बाजारात आवक वाढल्याने लाल मिरचीच्या भावात ३० ते ४० टक्के घसरण झाली आहे. गेल्यावर्षी १२० रुपये प्रतिकिलो असलेली मिरची ८० रुपये प्रतिकिलोवर आली. 

सोमवारी रंगपंचमीमुळे बाजारपेठ बंद होती. मंगळवारी आणि बुधवारी कळमना बाजारात लाल मिरचीची आवक मोठ्या प्रमाणात झाली. गेल्या आठवड्यातही मिरचीची आवक उत्तम होती. ५० ते ५५ हजार पोत्यांची आवक गेल्या आठवड्यात झाली होती. विदर्भ, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमध्ये यंदा मिरचीचे उत्तम पीक झाले. संक्रांतीनंतर आवक सुरू झाली होती, चांगली आवक असल्याने किमतीही घसरल्या आहेत.

गेल्यावर्षी तेजा मिरचीचे भाव प्रतिकिलो १२०  रुपये होते, ती ८० रुपये प्रतिकिलोपर्यंत घसरली आहे. लाल मिरचीची आवक वेगवेगळ्या राज्यातून वेगवेगळ्या मोसमात होत असते. आंध्र प्रदेशात सर्वाधिक उत्पादन होत असल्याने  त्याच राज्यात झालेल्या उत्पादनावरुन लाल मिरचीचे भाव निश्‍चित होतात. यंदा पेरणीच्या वेळेस आलेला पाऊस मिरचीच्या पिकासाठी उत्तम होता. त्यामुळे मिरचीच्या लागवडीत विक्रमी वाढ झाली. त्यानंतरही पावसाने चांगली हजेरी लावली. वाढलेले उत्पादनामुळे मिरचीचे उत्पादन वाढल्याने भावात घसरण सुरु झालेली आहे, असे मिरची व्यापारी प्रकाश वाधवानी यांनी सांगितले. 

२० दिवसांत आवक वाढणार
बाजारात खम्मम येथील तेजा मिरचीचे भाव ८० रुपये प्रतिकिलो, गुंटूर उडुप मिरची ६५ रुपये प्रतिकिलो विकली जात आहे. सिरोंचा, मांडल आणि उमरेड येथील स्थानिक मिरचीचे चांगले उत्पादन झालेले आहे. आवक वाढली असताना विक्रीही झपाट्याने होत आहे. येत्या १५ ते २० दिवसांत अजून आवक वाढणार असली तरी भाव अजून घटण्याची शक्‍यता कमी  असल्याचे संकेत व्यापाऱ्यांनी दिलेत.

Web Title: chilly rate decrease