video : मराठी शाळा म्हणतेय, मला वाचवा होऽऽ

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 नोव्हेंबर 2019

""मी सोमलवाडा येथील "मनपा'ची शाळा बोलते. माझा जन्म 1931 चा. मी तब्बल 82 वर्षे सुरळीत सुरू होते. पण माझ्या खोल्यांतील बालकांचा गलका अचानक थांबला. एक ऐतिहासिक वारसा जपलेली मी. विस्तीर्ण मैदान, जवळपास एक एकरभर जागा. तीही वर्धा मार्गावरील मोक्‍याच्या ठिकाणी! या जागेमुळेच मला कुणाची तरी नजर लागली. आता मी खंगत चालली आहे. माझी अवदसा झाली आहे. नक्कीच कुणाची तरी नजर लागली आहे. मला वाचवा होऽऽ'' 

नागपूर : "सरकारी शाळा वाचवा संयुक्त कृती समिती'चे कार्यकर्ते सोमवारी सकाळी आठ वाजता माझ्याजवळ पोहोचले, तेव्हा मला अक्षरशः गलबलून आले. अचानक सर्वांनी हाताची साखळी केली आणि "चिपको आंदोलन' सुरू केले. आधी रोज माझ्या अंगाखांद्यावर बालके खेळायची; परंतु आज सात वर्षांनी झालेला माझ्या बांधवांचा स्पर्श होताच मी ढसाढसा रडायलाच लागले. पण मी स्वतःला सावरले. 

""माझ्याप्रमाणेच या वैभवशाली नागपूर नगरीतील अनेक शाळा काळाच्या ओघात बंद करण्यात आल्या. याची कारणे खूपच विचित्र सांगण्यात आली. विद्यार्थीच मिळत नाहीत, असा युक्तिवाद केला गेला. मी म्हणते, तुम्ही आमची देखभाल करा. चांगले शिक्षक ठेवा. उत्तम ज्ञान इथे मिळू द्या. लोकांना काय खुशी आहे, खासगी शाळेत हजारो रुपये व्यर्थ खर्च करण्याची?'' माझे विचारचक्र सुरू असताना लोकांची भाषणे सुरू झाली. 


शाळा वाचविण्यासाठी चिपको आंदोलन करताना नागरिक 

या मैदानात रोज फिरायला येणारी बरीच मंडळी यावेळी मला दिसली. नारायण रागीट, गजानन चकोले, जनार्दन हाडके. जी. एन. नगरारे, दिलीप मिसाळ, स्वप्नील हाडके, मिलिंद वैद्य, विजय लेंढे, मधुकर विजयकर, शंकर काळे, नितीन लांजेवार, टिकाराम मेश्राम, आनंद कारमोरे, गोपाल तितरवार, राजेंद्र साठवणे, अस्मिता कांबळे, सोनाली गरडे, अनसूयाबाई वाळके, रत्नाकर यमदुलवार, अशोक जुमळे, जी. एच. तिलवार, अतुल आवळे, दीपक भोळे, आशीष हाडके, उमेश वैद्य, कार्तिक मंडल, अनिल दांडेकर, रितेश मुखर्जी आदी अनेक नेहमीच्या मंडळींसोबत काही नवीनही लोक दिसले. माझ्या बचावासाठी एवढी दिग्गज मंडळी पाहून मला हायसे वाटले. आणखीही भाषणे झाली.

Image may contain: 2 people, people standing and outdoor

मीडियातून आवाज मांडला जाईल

धीरज भिसीकर, अंकुश बुरंगे, प्रसेनजित गायकवाड, दीपक साने, दीनानाथ वाघमारे बोलले. खुशाल ढाक, मुकुंद अडेवार, रामा जोगराणा ही मंडळीही आल्याचे सांगण्यात आले. पत्रकार बंधूही दिसले. आता कुठे माझा दबलेला आवाज मीडियातून मांडला जाईल, याची मला खात्री पटली. 

Image may contain: 3 people, people standing and outdoor

बघतेय मोहल्ला सभेची वाट

"सोमलवाडा नागरिक सुधार समिती'चे लढवय्ये कार्यकर्ते नारायणराव रागीट, विजय लेंडे यांनी घोषणा केली की, शाळा वाचवा समितीच्या या आंदोलनामध्ये आम्ही सहभागी होऊ. ग्रामपंचायत पातळीवर ग्रामसभेला कायदेशीर अधिकार असतात, तसेच शहर पातळीवर प्रभाग सभा अर्थात मोहल्ला सभांना महत्त्व असते. लवकरच मोहल्ला सभा घेण्यात येईल, असेही त्यांनी बोलून दाखविले. मी आता वाट बघणार आहे. पण मला आशा आहे. मी लवकरच पुनरुज्जीवित होईन. 

Image may contain: 5 people, people smiling, people standing and outdoor

शाळा आपण सुरू केली पाहिजे 
ही शाळा आपण आता सुरू केली पाहिजे. ही शाळा हडपण्याचे षड्‌यंत्र आता आपण एकजुटीने हाणून पाडले पाहिजे. 
- अमोल हाडके, 
सामाजिक कार्यकर्ते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chipko movement for saving government school