नोटा बदलण्यासाठी नागरिकांची तारांबळ 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 नोव्हेंबर 2016

भंडारा - पाचशे व हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्याचा निर्णय केंद्र सरकारने मंगळवारी (ता. 8) घेतला. त्यानंतर बुधवारी देशभरातील बॅंका बंद ठेवण्यात आल्या होत्या. सरकारच्या आवाहनानुसार पाचशे व हजारच्या नोटा बदलून घेण्यासाठी तसेच जमा करण्यासाठी आज बॅंकेत ग्राहकांची तोबा गर्दी उसळली होती. बॅंका सुरू होण्याच्या काही वेळापूर्वीच नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. व्यवहार बंद होईपर्यंत ही गर्दी कायम होती. बाहेर पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. 

प्रामुख्याने स्टेट बॅंक, महाराष्ट्र बॅंक, बॅंक ऑफ इंडिया, सेंट्रल बॅंक, सिंडिकेट बॅंक या जुन्या बॅंकांच्या शाखांमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांनी एकच गर्दी केली होती. याशिवाय, अन्य राष्ट्रीयीकृत बॅंकांमध्ये त्यांच्या खातेदारांची झुंबड होती. 

काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी सध्याच्या चलनातील पाचशे व हजारांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णय चांगला असला, तरी सामान्य नागरिकांत संभ्रम व गोंधळाचे वातावरण झाले आहे. सरकारने हा गोंधळ दूर करण्यासाठी सामान्य नागरिकांना संयम ठेवण्याचे आवाहन केले होते. नागरिकांची गैरसोय टाळता यावी, यासाठी शनिवार व रविवार या सुटीच्या दिवशीही बॅंका सुरू राहणार आहेत. आपल्या जवळील पाचशे व हजारच्या नोटा लवकरात लवकर कशा बदलता येतील, याची चिंता सामान्यांना लागून आहे. अनेकांकडे जास्त रक्कम नाही. शंभर व पन्नास रुपयाच्या सुट्या नोटा नसल्याने घरखर्चासह इतर आर्थिक व्यवहार खोळंबले आहेत. त्यामुळे आपल्याकडे असलेल्या नोटा बदलून घेण्यासाठी अनेकांची घाई झाल्याचे दिसून आले.

Web Title: Citizen distracted to change currency