Video : वयाच्या तिसऱ्या वर्षी अपघातात गमावले दोन्ही हात; रंगाच्या दुनियेत तिला मिळाले जगण्याचे बळ

Citizens are fascinated by the pictures of disabled Mohini Dagwar
Citizens are fascinated by the pictures of disabled Mohini Dagwar

यवतमाळ : एखादा अपघात, दु:खद घटना अनेकांच्या मनात कायमची घर करून राहते. त्या वेदनेला कवटाळत माणूस निराशेच्या गर्तेत सापडतो आणि जगात आपल्या इतके दु:खी कुणीच नाही, अशी भावना होते. मात्र, याला अपवाद ठरलेली वयाच्या तिसऱ्या वर्षी अपघातात दोन्ही हात गमावून आयुष्यात जिद्दीने उभी राहणाऱ्या मोहिनीच्या चित्रांनी यवतमाळकरांचा भुरळ घातली आहे. रंगाच्या दुनियेत ‘ती’ला जगण्याचे बळ मिळाले आहे. त्यामुळेच मोहिनीचा जीवन प्रवास प्रेरणादायी ठरणारा आहे.

मोहिनी सुधाकर डगवार, असे दिव्यांग असूनही अभ्यासासह चित्रकलेत पारंगत असलेल्या तरुणीचे नाव आहे. दिव्यांगावर मात करीत आयुष्यात जिद्दीने गगन भरारीचे स्वप्न बघणाऱ्या मोहिनीच्या चित्रकलेचे प्रदर्शन नगरभवन येथे भरले. या ठिकाणी भेट देणाऱ्या नागरिकांनी मोहिनीच्या कलेचे मुक्तकंठाने प्रशंसा केली.

गांधीनगर परिसरात मोहिनी वास्तव्यास आहे. वडील सुधाकर डगवार ऑटोचालक आहेत. मात्र, त्यांनी मुलीला दिव्यांग असल्याची जाणीव होऊ दिली नाही. मोहिनी तीन वर्षांची असताना वैष्णोदेवी येथून येत असताना रेल्वेखाली आल्याने अपघात झाला. यात तिच्या दोन्ही हाताला गंभीर दुखापत झाली. कालांतराने लोखंडामुळे विषबाधा झाल्यामुळे दोन्ही हात कापावे लागले.

असह्य वेदना सहन करीत तिने आपला प्रवास सुरू केला. दोन्ही हात नसतानाही आपल्यात काही उणीव आहे, याचा विचार तिने केला नाही. अभ्यासात हुशार असल्याने आई-वडिलांनी तिला उच्चशिक्षित करण्याचा ध्यास घेतला. दहावी व बारावीत प्रथमश्रेणीत उत्तीर्ण झालेल्या मोहिनीने कॉम्प्युटर सायन्समध्ये बीएस्सीची पदवी मिळविली आहे. आता ती स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहे.

सुरुवातीला पेन्सीलीने वहिवर चित्र रेखाटायची. दोन वर्षांपासून कुंचला हातात पकडून कॅनव्हासवर विविध प्रकारची चित्रे काढते. स्केच, निसर्ग, महापुरुषांचे चित्रे तिने रेखाटली आहेत. विशेष म्हणजे मोहिनीने कुठेही चित्रकलेचे तांत्रिक प्रशिक्षण घेतलेले नाही. शासकीय नोकरी करून तिला आपली आवड जोपासायची आहे.

जीवनात पुढे चालत रहायचे
मनाला जे आवडते ते केले पाहिजे. लहानपणी वहीवर चित्र काढायची. आता कॅनव्हासवर मनाला जे पटते ते चित्र काढते. रंगाच्या सानिध्यात एक वेगळीच मज्जा मिळते. कोणताही प्रकारचा न्युनगंड न बाळगता जीवनात पुढे चालत रहायचे. आपल्याला दोन्ही हात नाहीत. असा कधीच विचार केला नाही.
- मोहिनी डगवार,
चित्रकार, यवतमाळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com