शहर बससेवेला लागेल कुठल्याही क्षणी ‘ब्रेक’

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 ऑगस्ट 2018

नागपूर - शहर बस चालविणाऱ्या ऑपरेटरची आर्थिक स्थिती नाजूक असून, डिझेल खरेदीसाठीही पैसे नाही. मंगळवारी तिन्ही बस ऑपरेटरने थकीत रकमेसाठी आयुक्तांकडे तगादा लावला. सद्यस्थितीत महापालिकेकडे पैसे नसल्याचे नमूद करीत आयुक्तांनी हात वर केले. त्यामुळे दीड लाख नागपूरकरांच्या प्रवासाची सुविधाच बंद होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

शहर बस चालविणाऱ्या ऑपरेटरला ९० दिवसांत निधी देणे बंधनकारक आहे. मात्र, १२० दिवस लोटल्यानंतरही थकीत ३९ कोटी मिळत नसल्याने तिन्ही बस ऑपरेटर त्रस्त झाले आहेत. बॅंकाकडून कर्ज काढून बस चालविणाऱ्या ऑपरेटरकडे केवळ आजचा दिवस पुरेल एवढेच  डिझेल शिल्लक आहे. त्यानंतर डिझेलचे टॅंकर खरेदी करण्याची क्षमता नसल्याचे समजते. त्यामुळे तिन्ही ऑपरेटर महापालिका आयुक्तांना भेटले. महापालिका आयुक्तांनी वित्त व लेखा अधिकारी मोना ठाकूर यांनाही बोलावून घेतले. ठाकूर यांनी सद्यस्थितीत महापालिकेकडे निधी नसल्याचे स्पष्ट केले. आयुक्तांनीही ऑपरेटरला स्पष्टपणे निधीचा अभाव असल्याचे सांगितले. यावर ऑपरेटर्सनी शहर बससेवा बंद करण्याची शक्‍यता व्यक्त केली. ऑपरेटर्सनीही त्यांच्याकडे काहीच पैसा नसल्याचे सांगितले. आयुक्तांनी निर्णय घेण्यास तुम्ही मोकळे आहे, असे स्पष्ट केले.

ऑपरेटर्सचे एप्रिल ते जून या तीन महिन्यांचे पैसे महापालिकेकडे थकीत आहे. ऑपरेटर  बाजारातून कर्ज काढून बससेवा देत आहे. काही वित्त संस्थांना त्यांनी धनादेश दिले आहेत. ते न वटल्यास ऑपरेटर संकटात येण्याची शक्‍यता आहे.

जीएसटी अनुदान लांबल्याने संकट
जीएसटीचे अनुदान महिनाअखेर महापालिकेला मिळत असते. परंतु, जुलै महिन्याचे अनुदान अद्याप मिळाले नाही. जीएसटी अनुदान रात्रीपर्यंत मिळाल्यास निधी देण्यात येईल, असे आयुक्तांनी ऑपरेटर्सना सांगितले. जीएसटी अनुदान लांबल्याने शहर बससेवा बंद पडण्याची शक्‍यता निर्माण झाल्याचीही चर्चा रंगली.

Web Title: city bus break diesel money economic condition